नंदुरबार ! प्रतिनिधी
जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे ,असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी केले.
ॲड.पाडवी म्हणाले, शासनाच्या प्रयत्नात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. कोरोना काळात राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान येाजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 43 हजार 581 नागरिकांच्या बँक खात्यावर एकूण 28 कोटी 72 लाख 62 हजार रुपये जमा करण्यात आले असून 64 हजार 344 आदिवासी कुटुंबांना खावटी कीट वितरीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1 लाख 54 हजार 912 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, सुसज्ज ग्रंथालय, ट्रामा केअर सेंटर, आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृह इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती अशा विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. सामुहीक प्रयत्नांच्या बळावर जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शनानुसार पीके घ्यावीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. संकटकाळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ऑलिम्पिक स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांनी भारतीय खेळाडुंचे त्यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यातील युवक-युवतींमध्येदेखील खेळात पुढे जाण्याची क्षमता असून त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाडवी यांनी देशाच्या स्वातंत्र्यांसाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिल्याचे सांगितले. शहीद शिरीषकुमार आणि त्याचे साथीदार, रावलापणी येथे हौतात्म्य पत्करलेले स्वातंत्र्य सैनिक, चिमठाणा येथे इंग्रजी खजिन्याची लुट करणारे स्वातंत्र्य सैनिक, बिरसा मुंडा आणि अन्य आदिवासी स्वातंत्र्य योद्ध्यांचे योगदान मोलाचे असल्याचे ते म्हणाले. देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांचे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.