नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ नागन नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. परंतु, मातीचा पूल पहिल्याच पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांना दळणवळणासाठी मोठी गैरसोय निर्माण झाली होती.
अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या पाहणीनंतर पुन्हा या ठिकाणी पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. निकृष्ट दर्जाचा पूल दोनच दिवसात पुन्हा वाहून गेल्याने दहा गावातील नागरिकांना दळणवळणाची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
मोठ्या पुलाचे काम ठेकेदाराने उन्हाळ्यात अर्धवट करून काम बंद केले होते. पावसाळ्यात पर्यायी पूल वाहून गेला, पुन्हा तयार केला तोही वाहून गेला. पर्यायी पूल तयार करताना नागरिकांनी प्रशासनाला काम मजबूत करण्याची विनंती केली.
परंतु थातूरमातूर काम करून पळ काढल्याने देवळीपाडा, निमदर्डा, मोतीजीरा, पांढरफळी, पाटीलफळी, वागदी अशा दहा गावांना दळणवळणाची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. खराब काम करून शासनाची व नागरिकांची डोकेदुखी ठरणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर वरिष्ठांनी कडक कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.