शहादा l प्रतिनिधी
रस्ते विकास महामंडळ अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या आंतरराज्य रस्त्याचे काम सुरू असतांनाच हा रस्ता वाहनधारकांसाठी गैरसोयीचा ठरत आहे. संथ गतीने सुरू असलेले काम आणि कामाचा निकृष्ट दर्जा सध्या चर्चेचा विषय ठरला असून वाहन चालक तसेच प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारीचा सुर तसेच नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशला जोडणाऱ्या कोळदा ते खेतिया या रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळ अंतर्गत खाजगी ठेकेदारामार्फत सध्या सुरू आहे.सुमारे तीन वर्षांपासून काम सुरू असून कासव गतीने काम होत असल्याने वाहनधारक तसेच प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गावर तापी-गोमाई-सुसरी नदीवरील सध्या अस्तित्वात असलेल्या पूलांची अत्यंत दुर्दशा झाली आहे.
या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक व प्रवासी वर्गास अगदी जीव मुठीत घेऊन प्रवास करणे भाग पडत आहे. संबंधित ठेकेदार व अधिकारी वर्गाचे दुर्लक्षित धोरणामुळे रस्ता कामाचा दर्जा निकृष्ट झाला आहे. शहादा तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट झाले असल्याने मोठे खड्डे पडले आहेत.
साईड पट्ट्यांचेही व्यवस्थितपणे काम केले नसल्याने वाहने अपघातग्रस्त होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून तापी गोमाई नद्यांना पूर आलेले आहेत.अशावेळी धोकेदायक पुलावरून वाहन जात असतांना प्रवासी वर्गाच्या जीविताच्या प्रश्न उभा राहिला आहे.त्यामुळे तालुक्यातील विविध पक्षीय सामाजिक,राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गत रविवारी रस्ता रोको आंदोलन केले.
तद्नंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासन दिले असून तात्पुरत्या स्वरूपात डागडूजी करण्यात येत आहे. मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, भेगा तसेच साईड पट्ट्यांचे अपूर्ण काम यामुळे आजही सातत्याने अपघात होत आहेत. वेग प्रतिबंधक खूणा रस्त्यावर नसल्याने जीवितहानी सुद्धा वेळप्रसंगी होत असून
या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. शहादा तालुक्यातील पूल व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांसह प्रवासी वर्गाकडून नाराजीचा सूर व्यक्त होत असून लवकरच जन आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
“संबंधित अधिकाऱ्यांनी पूलांसह रस्त्यांचे वेळोवेळी पर्यवेक्षण करणे अपेक्षित आहे.पूलांच्या दुर्दशेबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.संबंधित ठेकेदाराने जनता व प्रवाशांच्या जीविताशी खेळू नये. पूल व रस्त्याच्या दुरावस्थेने भविष्यात दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत.”
प्रा.मकरंद पाटील,
उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष जिल्हा नंदुरबार.