नंदूरबार l प्रतिनिधी
विसरवाडी ते सेंधवा राष्ट्रीय महामार्गावरील (क्र.७५२ डी)चा नूतनीकरनाचे काम सुरु आहे त्यात प्रकाशा येथील तापी व गोमाई नदी पुलावरील खड्डे व ठिकठिकाणचे नादुरूस्त रस्त्यांमुळे आजपर्यंत अनेक निष्पापांचा बळी गेला तर शेकडो जायबंदी झाले. वारंवार शासन दरबारी तक्रारी मांडूनही उपयोग होत नसल्याने अखेर निद्रिस्त प्रशासनास जाग आणण्यासाठी रविवारी सकाळी १० वाजता परिसरातील जनता, सर्वपक्षीय नेते, शेतकरी,नोकरदार, शेतमजूर, विविध संघटना तर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांतर्फे विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी एम. एस. आर. डी.च्या सक्षम अधिकारी श्रीमती दळवी यांनी रस्ता दुरुस्ती कामाला प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.
राज्य रस्ते विकास महामंडळ नाशिक यांच्यामार्फत नियोजित विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. परंतु तेही अपूर्णावस्थेत आहे. या रस्त्यावरील तापी व गोमाई पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. आतापर्यंत या अपुर्ण मार्गाने तब्बल ३८ जणांच्या बळी घेतला आहे. दुरुस्ती करण्या संदर्भात वेळोवेळी निवेदने दिली आंदोलने झाली मात्र उपयोग झाला नाही.
रविवारी सकाळी १० ला प्रकाशा डामरखेडा रस्त्यावरील गोमाई नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष हरिभाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम ,मासवादी कम्युनिस्ट पक्षाचे ईश्वर पाटील ,सुनील गायकवाड ,अखिल भारतीय ग्राहक तक्रार मंचचे विष्णू जोंधळे, सूतगिरणीचे संचालक दिलीप पाटील, किशोरअण्णा चौधरी, दत्तू पाटील आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
खड्डे आणि नादुरुस्त रस्त्यामुळे तयार झालेल्या चिखलात आंदोलन कर्ते आपल्या मागणीसाठी तब्बल दोन तास उभे होते.प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी ,रस्त्ये विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती दळवी आदी उपस्थित झाले होते.
दरम्यान,कित्येकांचा बळी घेणारा,अनेकांना अपंगत्व देणा-या या रस्त्यावरून जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, अधिकारी सातत्याने वावरतात परंतु खड्डे , रस्ता दुरुस्ती बाबतची त्यांची मानसिकताही होऊ नये हा एक प्रश्न आहे. आकांक्षीत जिल्हा असतांना देखील या गंभीर प्रकरणाकडे का दुर्लक्ष केले जात आहे. असा सवाल संतप्त व आक्रमक आंदोलन कर्त्यांतर्फे करण्यात येऊन जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या व अधिकाऱ्यांच्या जाहीर निषेध केला.
सक्षम अधिकाऱ्यांचा लेखी आश्वासन व प्रत्यक्ष दुरूस्ती कामाला सुरुवात झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, आंदोलन नियोजित होते, होणार होते यासाठी पोलीस प्रशासनाने आधीच सकाळपासून वाहतूक व्यवस्थेत बदल करून वाहने दुसऱ्या मार्गाने वळविली होती. तरीही शेकडो वाहनांच्या महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनानंतर तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली असल्याचे समजते.