नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात अक्कलकुवा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या वडफळी परिसरात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाचे आ. ॲड. के.सी. पाडवी यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.व नुकसान ग्रस्तांना आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले.
दि. 10 व 11 जुलै रोजी वडफळी मंडळात अतिवृष्टी झाल्याने वडफळी गावाचा परिसर हा जलमय झाला होता. येथील देवनदीला दोन वेळा महापूर आल्याने पुराचे पाणी शासकीय आश्रमशाळेत शिरुन मोठे नुकसान झाले होते.
तसेच गावातील अनेक घरात पाणी शिरुन जीवनावश्यक व संसारोपयोगी साहित्य वाहुन गेले होते त्यामुळे अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.के.सी. पाडवी यांनी वडफळी गावात भेट दिली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सिमा वळवी,माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक,जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी,महिला बाल कल्याण सभापती निर्मला राऊत,जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी,
प्रताप वसावे, हारसिंग पावरा,नानसिंग वळवी, शिवराम वळवी,माजी पं.स.सदस्य वाण्या वळवी, सरपंच गुमानसिंग तडवी,आनंद वसावे, जगदीश वसावे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. ॲड. के.सी. पाडवी यांनी नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधलेल्या इमारतीची पाहणी करून अपूर्ण कामाचा आढावा घेतला. अपुर्ण राहिलेले इलेक्ट्रिकचे काम तातडीने पुर्ण करुन लवकरात लवकर इमारतीचे उदघाटन करुन इमारत कार्यान्वित करण्याचे सुतोवाच केले.तसेच शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन तेथील वर्गखोल्या वस्तीगृह निवासस्थान आदींची पाहणी करुन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी आ.ॲड. के सी पाडवी यांनी ग्रामस्थां सोबत आश्रमशाळेत एक छोटेखानी बैठक घेऊन महापुरा पासून ग्रामस्थ व शेती यांचा बचाव करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत माहिती घेतली.
तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.भविष्यात ही आश्रमशाळेला महापुराचा धोका कायम असल्याने गावात जागा उपलब्ध झाल्यास वस्तीगृहाची इमारत इतरत्र हलविता येईल का याबाबत आ.ॲड. के.सी.पाडवी यांनी चाचपणी केली तसेच ग्रामस्थांना ही पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी विनंती केली.
ग्रामस्थ व शेतीला महा पुराचा फटका बसु नये या साठी देव नदीला एक किलोमीटरपर्यंत संरक्षण भिंत बांधणे याबाबत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी देखील ग्रामस्थां सोबत संवाद साधला.