नंदुरबार l प्रतिनिधी
खान्देशची कुलदैवत कानूमातेचा उत्सव नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे येत्या ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. यासाठी गावकऱ्यांनी रविवारी बैठक आयोजित केली यात सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे दोन वर्ष कानुबाई मातेचा उत्सव झाला नव्हता मात्र यावर्षी उत्सव नियमांचे पालन करून जल्लोषात साजरा करण्यात येणार असल्याने युवा वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रावण महिन्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी रजाळेकर सज्ज झाले आहेत. कानुमातेचा उत्सव हा ३० जुलै रोजी भाजी – भाकरीचा रोट तर ३१ रोजी कानुबाई मातेची स्थापना करण्यात येणार आहे.
तसेच १ ऑगस्ट रोजी गावातून वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार आहे. सलग ३ दिवस कार्यक्रम असल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाला परगावी गेलेले कुटुंबातील सदस्यही आवर्जून हजेरी लावत असल्याने कुटुंबामध्ये एकोपाचे वातावरण निर्माण होते.
हा उत्सव गावात- घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यामुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण होते या कार्यक्रमादरम्यान महिला वर्ग विविध अहिराणी मराठी गीते गाऊन रात्र जागून काढतात.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकट असल्याने उत्सव झाला नव्हता मात्र यावर्षी हा उत्सव आनंदात साजरा करण्यात येणार आहे असे सर्वांनी मते गावकऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.








