नंदुरबार l प्रतिनिधी
सातपुड्यातील पर्यटन स्थळ तोरणमाळ येथे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात पर्यटक दाखल झाले आहेत.
राज्यातील महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळांपैकी सातपुडा पर्वतरांगेत तोरणमाळ पर्यटन स्थळ पावसामुळे निसर्ग सौंदर्याने बहरले आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे सीताखाई जवळील धबधबे ओसांडून वाहत असल्याने पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे.
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसर पूर्णतः हिरवागार झाला असून सातपुड्याच्या डोंगरामध्ये ढगाळ वातावरण पर्यटकांना जवळून अनुभवास मिळतो आहे. खडकी पॉईंट या ठिकाणी देखील मोठी गर्दी होत आहे.
तर सीताखाई येथे गर्दी करीत आहेत. सीताखाई जवळील धबधबे पाहून आनंद लुटत आहेत. पावसामुळे वातावरण पूर्णतः थंड झाले आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात मधील पर्यटक दाखल झाले त्यामुळे मोठी वर्दळ वाढली आहे. शेकडो खाजगी वाहने दाखल झाली आहेत. म्हसावद पोलिस प्रशासनाने सीताखाई जवळ पोलिस बंदोबस्त लावला आहे.
खासगी हॉटेल्स, लॉजिंग, तसेच शासकीय विश्रामगृहे गर्दीने भरलेले आहेत. तर पावसामुळे यशवंत तलाव हा काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागला आहे. पर्यटक तलावाच्या काठावर उभे राहून आनंद घेत आहेत. दिवसभर पर्यटक बोटीमध्ये फेरफटका मारत असल्याने स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.