नंदुरबार l प्रतिनिधी
अखेर चौथ्या दिवशी राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
नवापूर तालुक्यातून जाणारा आंतरराज्य नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडी गावाजवळ अतिवृष्टीमुळे सरपनी नदीवरील तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला पूल वाहून गेल्याने महामार्ग ठप्प झाला होता.
दरम्यान गेले तीन दिवस नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पूल दुरुस्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागले. माती टाकून दुरुस्त केलेला पूल पुन्हा वाहून गेल्यानंतर चौथ्या दिवशी पावसाचा जोर कमी झाल्याने ठेकेदाराकडून सदर पुलावर माती टाकून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्यात आल्याने महामार्ग प्रशासनाने पुलावरून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
दिवसभरातून तीन हजार पेक्षा अधिक वाहने ये जा करत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या कच्चा पुलावरून अपघात होऊ नये यासाठी महामार्ग प्रशासनाने फक्त एकेरी वाहतूक सुरू ठेवावी असे आवाहन केले आहे.
अखेर चौथ्या दिवशी सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहनांसाठी सुरू झालेला आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास पुरामुळे सदर पूल पुन्हा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महामार्ग प्रशासनाने वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. परंतु गेल्या आठ वर्षापासून नवापूर तालुक्यात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जा आणि संथ गतीने सुरू असल्यामुळे वारंवार वाहन चालक व सर्व सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना गैरसोय निर्माण होत आहे.