नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथे दि.10 व 11 जुलै रोजी ढगफुटी सदृश्य पावसाने वडफळी गावाचा परीसर जलमय झाला होता त्यामुळे आश्रमशाळे सहीत वडफळी गावात पुराचे पाणी शिरले.वडफळी मंडळात दोन दिवसांत तब्बल 600 मिमी पावसाची नोंद झाली.ठिक ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळून रस्ते बंद झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले या पार्श्वभूमीवर आमदार आमश्या पाडवी यांनी वडफळी येथे भेट देवून परिस्थितीची पाहणी करुन नागरिकां सोबत संवाद साधला.
दरम्यान आमश्या पाडवी यांनी वडफळी येथील आश्रम शाळेला व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली व सद्य स्थिती समजुन घेतली पाच ते सहा दिवस उलटल्यानंतरहि शाळेची साफसफाई न करता परिस्थिती जैसे थे असल्याने आमदार पाडवी यांनी आश्रम शाळा प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताला लागलेल्या पाण्याच्या गळतीने आमदार पाडवी यांनी नाराजी व्यक्त केली.सदर आरोग्य केंद्रात ही पुराचे पाणी गेले त्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवे पासुन वंचित राहावे लागत आहे.
आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे मात्र माजी पालकमंत्री आ.ॲड.के.सी.पाडवी यांनी वेळीच इमारतीचे उद्घाटन न केल्याने जुन्या गळक्या इमारतीत रुग्णांना उपचार घ्यावे लागत असल्याने आ.पाडवी यांनी नाराजी व्यक्त करत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर तपासले. कर्मचारी सतत दांडी मारत असतात त्यामुळे
त्यांना जिल्हा प्रशासनाने शिस्त लावावी याबाबत जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना तक्रार करणार असल्याचे सांगितले.तसेच परिसरातील नुकसानीचा ताबडतोब पंचनामा करून लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना आदेशीत करणार असल्याबाबत सांगितले
यावेळी ,माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलसिंग वळवी,कान्हा नाईक,गोलु चंदेल,सुरेश वसावे माजी पंचायत समिती सदस्य,रायसिंग वळवी आदी उपस्थित होते.