नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहनांसाठी बंदच असून पुरामुळे पुन्हा पुलाचा काही भाग वाहून गेला होता दरम्यान पावसाने विश्रांती दिल्याने बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी महामार्ग खूला करण्यात आला आहे.

नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेल्यानंतर गेल्या 24 तासात ठेकेदाराकडून माती टाकून दुरुस्ती करण्यात आली होती.
परंतु काल संध्याकाळी झालेल्या पावसाच्या पुरामुळे पुलाचा काही भाग वाहून गेल्याने अवजड वाहनांना प्रवेश बंदच आहे. विसरवाडी गावाचा आज आठवडी बाजार असल्याने खेडेगावातून येणाऱ्या पादचारी व दुचाकीस्वारांना पुलावरून प्रवेश दिला जात आहे.
मात्र गेल्या पाच दिवसापासून नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्ग पूल तसेच अनेक गावांचे फरशी पूल तुटून दळणवळणाचा प्रश्न उद्भवल्याने आठवडी बाजारावर मोठा परिणाम झाला आहे.
विसरवाडी येथील आठवडी बाजार ग्राहकांना अभावी ओस पडला आहे. पावसाने विश्रांती घेतली असून महसूल व कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करावे तसेच बांधकाम विभागाने सबंधित गावांचे नांदुरुस्त फरशी पूल लवकर दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.








