नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने नंदुरबार जिल्ह्यात पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या पाच दिवसात सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा, धडगाव आणि सपाटी भागातील नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. आज पुन्हा या परिसरात पावसाने जोर धरला आहे.
नवापूर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीवरील पूल वाहून गेल्याने महामार्ग बंद झाला आहे.
गेल्या 24 तासात पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर काल रात्रभर व आज दुपारपर्यंत नदीमध्ये तात्पुरत्या कच्च्या पुलाचे काम केले होते, मात्र आज संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाने पुन्हा नदीला पूर आल्याने पूल पाण्याखाली गेल्याने दुरुस्ती केलेल्या कामावर पाणी फिरले आहे.
पावसाचा जोर वाढल्यास माती टाकून तयार केलेला पूल वाहून जाण्याचे दाट शक्यता असून नागरिकांना पुन्हा गैरसोय होणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.








