नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनीतील रहिवासी असणार्या एका बेरोजगाराची सुमारे नऊ लाख रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार येथील रेल्वे कॉलनीतील रहिवासी रविंद्र प्रकाश बाविस्कर यांच्या भावाला महिला व बालकल्याण संरक्षण अधिकारी या विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष देत सटाणा तालुक्यातील ठेंगाणा येथील विवेक विलास सोनवणे रा. व धुळे येथील वाडीभोकर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ओंकार बोरसे या दोघांनी रविंद्र बाविस्कर यांचा विश्वास संपादन केला.
सन २०१६ मध्ये दोघांनी रविंद्र बाविस्कर यांच्याकडून एकूण नऊ लाख रुपये इतकी रक्कम घेतली.यात विवेक सोनवणे याने साडे तीन लाख रुपये तर प्रमोद बोरसे याने साडे पाच लाख रुपये इतकी रक्कम घेतल्याचे रविंद्र बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दोघांनी रविंद्र बाविस्कर यांच्या भावाला नोकरी न लावता फसवणूक केली.तसेच दिलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ करत असल्याने रविंद्र बाविस्कर यांच्या फिर्यादीवरुन विवेक विलास सोनवणे व प्रमोद ओंकार बोरसे या दोघांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते करत आहेत.








