नंदुरबार l प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील पाताळगंगा नदी किनारी असलेल्या पुरातन श्री गजानन महाराज संस्थानतर्फे गण गण गणात बोतेचा जयघोष करीत भाविकांनी स्वहस्त लिखित नामजपाच्या पुस्तिका शेगाव येथे रवाना करण्यात आल्या.हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रवींद्र हिरालाल चौधरी यांच्या हस्ते श्री गजानन महाराजांची आरती करून नामजप पुस्तिका पाठविण्यात आल्या.
नंदुरबार शहरात गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक हिरालाल काका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम सुरू आहेत.
यावर्षी मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे अंतर्गत गणगण गणात बोते नामजप असलेली 11,1,1 11नामावलीची पुस्तिका प्रत्येक भाविकास वितरित करण्यात आली होती. त्यानुसार सुमारे 40 महिला भाविक आणि विद्यार्थिनींनी नामजप पूर्ण केल्या.
याप्रमाणे 44,440 नामजप असलेल्या पुस्तिका गुरुपौर्णिमेनिमित्त संकलित करण्यात आल्या. बुधवारी सकाळी श्री गजानन महाराज मंदिरात डॉ .रवींद्र चौधरी यांच्या हस्ते आरती करून नामजप पुस्तिका प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी गजानन महाराज संस्थानचे संचालक पांडुरंग मदनलाल सराफ, निवृत्त शिक्षक प्रकाश चौधरी, दिलीप तांबोळी, मुकुंद राळेगावकर, मुख्याध्यापक रुपेश चौधरी, विशाल कुलकर्णी, विपुल कुलकर्णी तसेच महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








