नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सहा पंचायत समिती सभापती, उपसभापती यांच्या निवडणूक कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांच्या उपसभापती निवडीसाठी येत्या १६ जुलै रोजी तेथील सभागृहात विशेष सभांचे आयोजन करण्यात आले असून, तशा नोटिसाही सदस्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पंचायत समितीच्या सभापतींचे आरक्षण मुदत संपूनही अजूनपर्यंत आदेश शासनाकडून काढण्यात आलेले नसल्यामुळे त्या दिवशी सभापतींची निवड होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पंचायत समित्यांच्या उपसभापती निवडीकरिता तेथील पंचायत समितीच्या सभागृहात १६ जुलै २०२२ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभांचे आयोजन करण्यात आले होते
दरम्यान महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागमार्फत्या निवडीला स्थगिती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या कार्यकाळाशी संबंधित महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ मधील संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
तथापि उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता , जिल्हयातील प्रस्तावित असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष / उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती / उपसभापती यांच्या निवडणूक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत तात्काळ स्थगिती देण्यात यावी .
तसेच ज्याठीकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष / उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती / उपसभापती यांचा विहित मुदतीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे त्याठीकाणी विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष / उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती / उपसभापती हे पुर्ववत प्रमाणे कार्यकाल सांभाळतील असे ग्रामविकास विभागातर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.








