नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कुकावल येथील होतकरू कुटुंबातील कर्ता तरुण मयूर सुनील देसले (वय २०) याचे ता. ६ बुधवार रोजी गेवराई ता.बीड येथे आयशर गाडीने जात असताना अपघाती निधन झाल्याने, कुकावल गाव सुन्न झाले आहे.
मयुर हा अविवाहित होता. त्याचा येत्या १३ जुलै रोजी वाढदिवस होता,मात्र वाढदिवसाच्या सात दिवसाआधीच काळाने झडप घातल्याने कुटुंबासह गाव सुन्न झाले आहे.त्याचा मोठा भाऊ दोन वर्षांपूर्वीच सैन्यदलात भरती झाला आहे.
भावाचा साखरपुडा पंधरा दिवसांपूर्वीच झाल्याने मयुर गेल्या काही दिवसांपासून घरीच होता मात्र भावाचा साखरपुडा आटपून दोन दिवसांपूर्वीच लातूर येथे आयशरने गाडीने जाताना गेवराई ता. बीड येथे ता. ६ जुलै बुधवार रोजी पहाटे अपघातात जखमी झाला, याबाबत घरी वडिलांना त्याने फोनवर माहिती देऊन स्वतः दवाखान्यात दाखल झाला.
मात्र मूत्राशय जवळ अधिक मार लागल्याने मयुरची प्राणज्योत मालवली,त्याची ओळख गावात व शाळेत शिस्तप्रिय म्हणून होती.त्याचे शिक्षण कळंबू विद्यालयात झाले होते.त्याच्या निधनाची वार्ता कुटुंब,गावात, मित्र परिवारात पसरताच सर्वच सुन्न झाले.
ता. ७ रोजी औरंगाबादहुन रुग्णवाहिकेने शव आणून संध्याकाळी उशिरा कुकावल ता. शहादा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी उपस्थितीतांचे डोळे पाणावले,त्याच्या घरी आई, वडील, भाऊ, आजी असा परिवार आहे.








