नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. गतवर्षी यावेळेपर्यंत जवळपास ७० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र ५५ मिलिमीटरच पाऊस झाल्याची नोंद असून खरीप हंगामातील शेतीकामे खोळंबली होती.
त्यामुळे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नंदुरबार जिल्हा वासियांना दमदार पावसामुळे समाधान लाभले आहे.आतापर्यंत झालेल्या पावसाच्या आधारे जवळपास ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यात जूनमध्ये दमदार पाऊस झाला.मात्र नंदुरबार तालुक्यात पावसाने दांडी मारली होती.त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर आज नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली.
काल सकाळच्या सत्रात पावसाची रिपझीप सुरु होती. मात्र दुपारी मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. दुपारी १२ ते २ वाजेपासुन पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचले होते. या मुसळधार पावसाने काहीसे समाधान व्यक्त केलं जात आहे.
जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या देखील खोळंबल्या होत्या जिल्ह्यात अवघ्या ४० ते ४५ टक्केच पेरण्या पुर्ण झाल्या असुन नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा़र्या वीरचक्क धरणात देखील अवघा २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणी टंचाईचे मोठे संकट उभं टाकलं होत. अशातच या पावसामुळे काहीसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गतवर्षीही लघू आणि मध्यम प्रकल्पांमध्ये कमी पर्जन्यमानामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नव्हता. अद्यापही अनेक प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अखेर आज झालेला पाऊस सातपुड्यासह सपाटी भागातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार, नवापूर तालुक्यांमध्ये दमदार झाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.