नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा समावेश आहे . शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करुन सुद्धा पीक न उगवल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे . यामुळे नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहिर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करण्यात यावा , अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली असून याबाबत पालकमंत्री अँड.के. सी.पाडवी , जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना निवेदन देण्यात आले आहे .
सदरच्या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस झाला असून यात नंदुरबारचा देखील समावेश आहे . शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करुन देखील पीक उगवले नाही . यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत . अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पीक पेरणी केली होती . मात्र पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे . महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांचे असल्याने शासनाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत . नंदुरबार जिल्ह्यात असंख्य गावांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळणार नाही , गुरांना जंगलात प्यायला पाणी शिल्लक राहणार नाही , ठराविक काही भागांमध्ये पाऊस पडतो आहे . परंतू जिल्ह्याचा काही भाग हा पावसापासून वंचित आहे . एखाद्या भागात पाऊस पडतो म्हणजे जिल्ह्यात पाऊस झाला असे नाही . पर्जन्यमापक यंत्र हे सर्व प्राथमिक केंद्राच्या भागाप्रमाणे बसविण्यात आले आहे . नंदुरबार जिल्ह्यात भविष्यातील भीषण दुष्काळी संकट पाहता नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करावा व तसा जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव करावा , अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निवेदनातून केली आहे .