नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ग्रामिण भागात बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. प्रशासन व एस. टी. महामंडळ यांना निवेदन देवुनही कारवाई होत नसल्याने विविध गावातील नांगरीकांनी आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
वैश्विक महामारी मुळे शैक्षणिक वर्षे २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले. आणि सुदैवाने हा महामारीचा काळ संपल्यानंतर लगेचच एस.टी.महामंडळाचा संप पुकारण्यात आला. यामुळे विद्यार्थी-पालक पालकांमध्ये प्रचंड चिंता आणि नैराश्याची वेळ आली.
परंतु याही परिस्थितीत विद्यार्थी -पालकांनी खाजगी वाहन करून मार्ग काढला. परंतु आता २०२२-२३ चे तिसरे शैक्षणिक वर्षे सुरू होऊन सुमारे एक महिना झाला असून बंद झालेल्या बसेस अथवा फेरे कमी केलेल्या बससेवा त्वरित सुरू कराव्यात म्हणून यासंबंधी विद्यार्थी -पालकांनी आगारप्रमुख नंदुरबार व दोंडाईचा येथे निवेदन देवूनही बससेवा सुरू करण्यात आलेली नाही.
यामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांचे फार हाल होत आहेत. कारण बहुतेक विद्यार्थी पायी प्रवास करत असून वेळ प्रसंगी त्यांच्या जीवाला धोका आहे. यावरून प्रशासन आणि एस. टी. महामंडळ हे किती बेजबाबदार आहेत, हे दिसून येते. आणि यामुळे पालकांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे.
सकाळी ८.३० वा. दोंडाईचा ते नंदुरबार व्हाया खोंडामळी(दोंडाईचा डेपो), सकाळी ८:३० वा. नंदुरबार ते कार्ली पर्यंत येणारी बस कोपर्ली पर्यंत सुरू करण्यात यावी. अशी मागणी नांगरीकांनी केली आहे.अन्यथा मांजरे, बह्याने,
कोपर्ली,जुनमोहिदा, काकळदे,होळ,भालेर आदी गावातील नागरिकांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि याला संबंधित प्रशासन आणि आगारप्रमुख नंदुरबार दोंडाईचा हे जबाबदार राहतील असा ईशारा देण्यात आला आहे.








