नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) जिल्हा शाखा नंदुरबारच्यावतीने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वैयक्तिक, सामूहिक प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच शिक्षक परिषदेने आजपर्यंत सोडविलेल्या प्रश्नांची माहिती देण्याससाठी राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शिक्षक संपर्क अभियान राबविण्यात येत असून प्रत्येक तालुक्यात शिक्षक संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न तालुकास्तरावर जाऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी, शंका समाधान करण्यासाठी जिल्हास्तरीय शिक्षक संपर्क अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची सुरुवात पहिल्या टप्प्यात शहादा तालुकास्तरीय यशस्वी मेळाव्यानंतर आता अभियानाच्या दुसर्या टप्यात ९ जुलै रोजी अक्कलकुवा येथील पंचायत समिती सभागृहात तर १० जुलै रोजी नवापूर येथील लाखनीपार्क मधील प्राथमिक व उच्च प्राथमिक गुजराथी शाळेत करण्यात येत आहे.
तसेच १६ जुलै मोलगी, २३ ला धडगाव, ३० जुलै रोजी तळोदा व ३१ जुलै रोजी नंदुरबार येथे समारोप होणार आहे. यावेळी राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड, विभागीय सदस्य आबा बच्छाव,
जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, कार्यवाह किरण घरटे, कोषाध्यक्ष शरद घुगे, जिल्हा संघटन मंत्री प्रकाश बोरसे, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, दिनेश मोरे, जिल्हा कार्यलीयन मंत्री जगदीश पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चेतना चावडा आदी मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्यात ZPFMS प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत, पदोन्नती प्रक्रिया, एकस्तर वेतनश्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी, एनपीएस, एसजीपीएस खात्याबाबत, वस्तीशाळा शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणी, प्रलंबित प्रश्न, अपघात विमा १० लक्ष सानुग्रह अनुदानाबाबत
दहा वर्षाच्या आत मयत कर्मचार्यांना मिळणार्या दहा लक्ष सानुग्रह अनुदानाबाबत, शालेय पोषण आहार योजना, समग्र शिक्षा बांधकाम प्रलंबित अनुदान, सेवा पुस्तकाच्या नोंदी, वेतननिश्चित शिबिर, लेखापरीक्षण कार्यशाळा,
प्रलंबित वैद्यकीय बिले, प्रलंबित भविष्य निर्वाह निधी या बरोबरच तालुका व जिल्हास्तरावर हेतुपुरस्कर दिरंगाईने विलंब होणार्या प्रकरणाबाबत चर्चा होणार असल्याने आपले प्रश्न लिखित स्वरूपात घेऊन शिक्षक संपर्क मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी केले असल्याचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज चौधरी यांनी कळविले आहे.








