शहादा l प्रतिनिधी
शहरासह परिसरातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागणीचे निवेदन शहादा शहर भाजपाच्यावतीने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, गटशिक्षण अधिकारी डी.टी.वळवी यांना भाजपा शहर अध्यक्ष विनोद जैन यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील काही खाजगी शाळांमध्ये शाळा सुरू होतांना राष्ट्रगीत म्हटले जात नाही ही एक गंभीर बाब आहे.अशा शाळांवर कारवाई करून राष्ट्रगीत सुरू करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.काही शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही,
वर्गांमध्ये विद्युत पंखे नाहीत.विद्युत पंखे आहेत तर ते बंद असल्याच्या तक्रारी आहेत.असे निवेदनात म्हटले असून येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास भाजपा तर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात दिलेला आहे.
निवेदन देतांना भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जितेंद्र जमदाडे, हितेंद्र वर्मा, राजीव देसाई, कमलेश जांगिड, श्रीमती रोहिणी भावसार, अक्षय अमृतकर, रोशन जैन, अंकुश लोहार ,तेजस सराफ ,श्रीमती नंदा सोनवणे, जितेंद्र शिकलीकर सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.








