नंदुरबार | प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत नंदुरबार, नवापूर व शहादा या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ प्रवेशासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता जिल्हा परिषद शाळा व इतर शासन मान्यता प्राप्त शाळेतील अनुसूचित आणि आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा अनुसूचित आणि आदिम जमातीचा असावा. पालकांचे वार्षिंक उत्पन्न ६ लाख रुपयापेक्षा कमी असावे. अनुसूचित जमातीतील दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ जागा आरक्षित असतील. या आरक्षित जागेसाठी विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. अर्ज भरतांना रहिवासाचे गाव, तालुका, जिल्हा व भ्रमणध्वनी हे अचूक भरण्यात यावे.
एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कूल मध्ये प्रवेशासाठी आवेदनपत्राचा विहीत नमुना https://admission.emrsmaharashtra.com या वेब लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत भरून भरलेल्या अर्जाची प्रत डाऊनलोड करून ठेवायची आहे. इयत्ता सहावीत प्रवेश घेण्याकरिता पाचवीचे गुणपत्रक, सातवीत प्रवेश घेण्याकरिता सहावीचे गुणपत्रक, आठवीत प्रवेशासाठी सातवीचे गुणपत्रक तर नववीत प्रवेश घेण्याकरिता आठवीचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक राहील.
गुणपत्रकासंबधी शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये ज्या विद्यार्थ्यांची आकारीक व संकलित मुल्यमापन झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचे संबधित इयत्तेचे नऊ विषयांचे ( मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान,परीसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे, कला, कार्यानुभव व शारीरीक शिक्षण) प्रत्येकी १०० गुणांचे गुणपत्रक तयार करावे. ज्या विद्यार्थ्यांचे फक्त आकारीक मुल्यमापन प्रक्रिया पुर्ण झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचे आकारीक मुल्यमापनाचे विषयनिहाय प्राप्त गुण १०० मध्ये रुपांतरीत करावे. संबंधित इयत्तेचे नऊ विषयांचे प्रत्येकी १०० पैकी गुण विचारात घेऊन ९०० गुणांचे गुणपत्रक तयार करावे. पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी वेबलिंकवर गुणपत्रक अपलोड करतांना गुणपत्रक ९०० गुणांचे असल्याची खात्री करुन घ्यावी. शाळेकडून श्रेणी प्रदान केलेले गुणपत्रक गुणांमध्ये रुपांतरीत करुन घ्यावे. श्रेणी नमूद केलेले गुणपत्रक प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्यांचा सरल पोर्टलवरुन विद्यार्थी आयडी (१९ अंकी) माहित असणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांचा सरल आयडी आणि मोबाईल क्रमांक टाकून अर्जदार विद्यार्थ्यांचा पासवर्ड तयार करुन घ्यावा. पासवर्ड नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ एसएमएसद्वारे कळविला जाईल. विद्यार्थ्यांला ज्या इयत्तेमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्याची अचुक नोंद अर्जामध्ये करावी. पालकांचा राहण्याचा पत्ता विचारात घेवून विद्यार्थ्यांस गुणानुक्रमे नजीकच्या एकलव्य मॉडेल रेसिडेशियल शाळेत प्रवेश देण्यात येईल. विद्यार्थी आदिम जमातीमधील असेल तसे नमूद करावे. विद्यार्थ्यांनी फॉर्म भरतेवेळी मोबाईल क्रमांक व जन्म तारीख टाकणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेची गुणदान केलेली गुणपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत आवश्यक असेल.
अर्ज भरल्यानंतर एखादी माहिती दुरुस्त करावयाची असल्यास विद्यार्थ्यांचा सरल क्रमांक व पासवर्ड टाकून पुन्हा लॉगीन करुन माहितीत दुरुस्ती करावी व अर्ज अपडेट करावा. परिपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट काढण्यासाठी लॉगिन केल्यानंतर प्रिंट ऑप्शनमध्ये जावून अर्जाची प्रिंट काढता येईल. तरी इच्छुकांनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.