सत्तर च्या दशकातील नंदुरबार पंचायत समितीची निवडणूक होती. या निवडणुकीत तत्कालीन जनता पक्षामार्फत कोपर्ली गणात उमेदवार देण्यात आला होता(आज या भागात दादासाहेबांचे नातू अॅड.राम रघुवंशी हे निवडणूक लढवून विजयी झाले होते).जनता पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध स्व.बटेसिंगभैया रघुवंशी यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. स्व. दादासाहेब व जनता पक्षाच्या उमेदवारा दरम्यान निवडणूक अतिशय जिकिरीची झाली होती, कारण समोरील उमेदवाराच्या प्रचारासाठी तत्कालीन कॅबिनेट मंत्र्यांची देखील हजेरी होती,नंतर पंचायत समिती सभापती पदी त्यांची निवड करण्यात आली.यानंतर सलग पंचायत समिती सभापती पद सांभाळल्यानंतर दादासाहेब विधानपरिषदेत (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांमार्फत) निवडून आले. त्यावेळेस दादासाहेब आदिवासी भागातून बिगरआदिवासी आमदार म्हणून निवडून गेले होते. कदाचित त्यावेळेस ही ऐतिहासिक घटना असावी.दादांनी आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढला आणि त्यावेळेस दादांना जाणीव झाली की नंदुरबार तालुक्यात रस्त्याची समस्या खूप मोठी आहे व त्यामुळे तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे.
यानंतर लगेच दादासाहेबांनी तालुक्याची दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामीण रस्त्यांची बांधणी केली. शासन रस्तादेखील बांधून देते अशी कल्पनादेखील त्या वेळेस ग्रामीण भागातील नागरिकांना नव्हती अशा काळात दादांनी रस्त्यांची बांधणी करून दाखविले.उदाहरणार्थ त्याकाळी भालेर – नंदुरबार ये जा करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नव्हता, ही समस्या लक्षात घेऊन दादांनी भालेर-उमर्दे ते नंदुरबार रस्ता मंजुरीस आणून त्याची बांधणी करून दाखवली, त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील सर्वात मोठ्या शनिमांडळ या गावापर्यंत जायला देखील नंदुरबार शहरापासून वेगळा रस्ता अस्तित्वात नव्हता, त्याकाळी शनिमांडळ भागात जाण्यासाठी रनाळे मार्गे जावे लागत असे परंतु दादांनी वावद ते ढंडाणे रस्ता बांधल्यामुळे त्या भागातील नागरिकांची सोय झाली,आज शनिमांडळ ते नंदुरबार पर्यंत जो रस्ता उपलब्ध आहे तो फक्त दादांच्या प्रयत्नांमुळे. याप्रमाणेच नंदुरबार तालुक्यातील इतर ग्रामीण बाजारपेठेपर्यंत दादासाहेबांनी रस्ते पोचवले आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळवून दिली, फक्त अर्थव्यवस्थाच नाही यासोबतच आरोग्य व्यवस्थेला देखील वेग प्राप्त झाला, रस्त्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील मजूरवर्ग शहरात मजुरीसाठी जायला लागले, त्यामुळेच त्यांची शहरांशी ओळख निर्माण झाली, फक्त मजूर वर्गच नाही तर विद्यार्थी देखील शहरांत शिकायला जाऊ लागले, रस्ते उपलब्ध झाल्याने एसटी बसेस प्रत्येक गाव तसेच पाड्यापर्यंत पोहोचायला लागल्या.
ज्याप्रमाणे दळणवळण व्यवस्थेत दादासाहेबांनी तालुक्यात क्रांती घडवली त्याचप्रमाणे तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत देखील सुधारणा केल्या. कोपर्ली व लहानशहादे या पंचक्रोशीतील केंद्रस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्रांची दादांनी उभारणी केली. जलसंधारण क्षेत्रात देखील दादांचे कार्य अतिशय मोलाचे आहे. त्यासाठी त्यांनी पाझर तलावांची निर्मिती केली.आजचे होळ,बलदाणे, वडबारे व भालेर येथील पाझर तलाव म्हणजे दादा साहेबांचीच देण. या तलावामुळे भागातील जमीन सुपीक झाली आहे. शनिमांडळ येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या स्वरूप वाढीसाठी देखील दादासाहेबांनी प्रयत्न केले होते.यानंतर दादासाहेबांच्या प्रयत्नांनी तलावक्षेत्र वाढीस मंजुरी मिळाली.अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधल्यामुळे त्या परिसरातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त भाग सुखी झाला.
आपण आज ज्या पाणंद रस्त्यांच्या गोष्टी करतो,ते रस्ते दादासाहेबांनी सत्तरच्या दशकातच शेतशिवारात बांधले होते.1985 या साली दादा दूध संघाचे चेअरमन(संस्थापक) झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना जोडधंदा दिला. या दूधसंघ द्वारे शेतकरी दुधाला शासनास विकू लागले.तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे गाई-म्हशींचे वाटप केले. दूध संकलन केंद्र निर्माण करून शेतकऱ्यांना नवीन कार्यक्रम किंवा जोड धंदा दिला. त्यावेळेस दुग्ध क्रांतीचे जनक जणू काही दादाच होते.आज दूध व्यापाराचे संपूर्णपणे खाजगीकरण झालेले आहे परंतु या व्यापाराचा पायाच दादांनी त्याकाळी रचायचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.
स्व.जी टी बापूजींचे अगदी जवळचे सहकारी समजले जाणारे स्वर्गवासी दादासाहेबांना बापूजी प्रेमाने “कॅप्टन” म्हणत. दादासाहेब यांचे स्वप्न होते की बापूजी धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावेत आणि ते स्वप्न त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याने साकार करून दाखवले, यासोबतच स्वर्गवासी बापूजींचा राजकीय वारसा त्यांनी पुढे यशस्वीपणे चालू ठेवला.
स्व.जी.टी. बापूजींनी 1958 साली नंदुरबार शेतकी संघाची स्थापना केली.बापूजींच्या जीवन काळात शेतकी संघाची वाटचाल यशस्वी होती.त्यात सातत्य राखण्याचे कार्य त्यांच्या पश्चात दादासाहेब बटेसिंग भैय्या यांनी केले.आज शेतकी संघामार्फत बियाणे विक्री,धान्य खरेदी-विक्री व शेतकऱ्यांसाठी लागणारे इतर साहीत्य विक्री केले जाते. दादासाहेबांच्या नेतृत्वात शेतकी संघाचे वार्षिक उलाढाल 19 ते 20 कोटी असायची आणि आजही त्यांच्या आशीर्वादाने तेवढीच आहे. या सर्व उत्पन्नातून शेतकी संघात कार्यरत 20 ते 25 कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात येते. स्वर्गवासी दादासाहेब बटेसिंग भैय्या रघुवंशी यांनी आपल्या जीवन काळात अनेक सामान्य कार्यकर्त्यांना त्यांची पक्षाप्रती निष्ठा बघून एका नव्या उंचीवर नेऊन पोहोचवले. यात सर्वात आघाडीवर नाव येते ते प्रताप रुपजी वसावे यांचे. धानोरा ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या व्यक्तीला दादासाहेबांनी आपल्या विशेष राजकीय कौशल्याच्या बळावर नंदुरबार तालुक्याच्या आमदार पदी विराजमान केले. यासोबतच वि का सोसायटी सचिव असणाऱ्या रमेश दादा गावित यांना प्रत्येकी एका वेळेस जिल्हापरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी विराजमान केले. आत्माराम पाटील नामक भूविकास बँकेच्या शिपायांना मार्केट कमिटीच्या चेअरमन पदी विराजमान केले.यासारखे कित्येक सामान्य कार्यकर्त्यांना दादांनी घडवले आणि त्यांना एक नवीन ओळख दिली.
दादांनी नंदुरबार तालुक्यासह परिसरात आश्रमशाळा व छत्रालय सुरू केलेत. यामागे त्यांचा मूळ उद्देश होता कि आदिवासी बांधवांच्या पाल्यांना आश्रय देऊन त्यांना शिक्षण पुरवणे. त्यांची राहायची व खायची व्यवस्था देखील पाहणे. आश्रमशाळांमधील किराणा किंवा इतर खाण्याचे पदार्थ दादासाहेब स्वतः चाखून पाहायचे. दादा अचानकच या आश्रमशाळांना भेट देत असत आणि तेथील व्यवस्था पाहणी करत असत.
नंदुरबार शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या विरचक प्रकल्पाला मंजुरी देखील दादासाहेबांच्या कार्यकाळातच मिळालेली, किंबहुना यासाठी पाठपुरावा देखील दादासाहेबांनीच केलेला. नंदुरबार शहराला भविष्यात जास्त पाण्याची गरज भासेल याची जाणीव दादासाहेबांना त्या काळातच झाली आणि त्या दूरदृष्टीच्या बळावर फक्त विचार करूनच न थांबता त्यांनी नंदुरबार शहराचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या या भव्य प्रकल्पाला मंजुरी मिळवली.
दादांची दिनचर्या रोजची ठरलेली असायची.रोज सकाळी उठून व्यायाम करून शेतात पाहणी करून ग्रामीण भागातल्या एखाद्या गावात जाऊन तेथील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या दादा जाणून घेत असत. कित्येक वर्ष दादांनी ही दिनचर्या कायम ठेवली, यामुळेच दादा ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले होते. जनतेचा मनातलं जाणणारे दादासाहेब नेहमीच सर्वसामान्य व तळागाळातील जनतेतच जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रमले. ग्रामीण व शहरी अश्या दुहेरी भूमिकांमध्ये समाज मनाशी घट्ट ऋणानुबंध निर्माण करणारे दादासाहेब जिल्ह्यातील राजकारणा सह समाज कारणातल ‘दादा’ व्यक्तीमत्व. दादासाहेबांच्या दूरदृष्टीकोणामुळे आज जिल्हा कात टाकून विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय.जेष्टांसह तरुणांना दादा साहेब नेहमीच प्रेरक राहिले आहेत.दादासाहेबाना मोजक्या शब्दांत बांधणे तसे अवघडच आहे.शब्दरुपी कृतज्ञता वाहण्याचा एक छोटा प्रयत्न..
दिग्विजयसिंग राजपूत
(शनिमांडळ ता.जि.नंदुरबार)