नंदुरबार ! प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसकाळी ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला.यात १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली असून आपल्या स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास युवकांना माहीत व्हावा तसेच त्यापासून युवा पिढीला प्रेरणा प्राप्त व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे तीन समूह करण्यात आले होते.त्या समुहांना अनुक्रमे भगतसिंग , चन्द्रशेखर आझाद व राजगुरू या क्रांतीवीरांची नांवे देण्यात आली होती.प्रश्नमंजुषेच्या तीन फेऱ्या घेण्यात आल्या अंतिम फेरीत चंद्रशेखर आझाद या समुहाने बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला.तर दुसरा क्रमांक भगतसिंग व तिसरा क्रमांक राजगुरू समूहाला मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.ए.बी.महाजन होते. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. एस.के चौधरी , प्रा.पी.डी.पाटील यांनी केले.प्रास्ताविक प्रा.नितीन अन्नदाते यांनी केले. प्रश्नमंजुषा संचालन , आभार प्रदर्शन प्रा.सौ.वर्षा घासकडबी यांनी केले .कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ.सुहासिनी नटावदकर यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.