नंदुरबार | प्रतिनिधी
जेष्ठ नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन केला असून जेष्ठ नागरिकांच्या काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्यांनी जेष्ठ नागरिक कक्ष येथे येवून आपल्या समस्या मांडाव्यात निश्चीतच त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करुन समस्या सोडविल्या जातील असे प्रतिपादन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले.
ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा स्त्री / पुरुष व्यक्तींना जेष्ठ नागरिक म्हणून संबोधण्यात येते. प्रत्येक कुटुंबातील जेष्ठ हा घरातील आधारस्तंभ असतो. मात्र अनेक कुटुंबात याच आधारस्तंभाला योग्य वाकणूक मिळत नाही.
ज्या जेष्ठ नागरिकांना त्यांचे मुले किंवा मुली वागवत नाही किंवा उतार वयात त्यांचे संगोपन करीत नाहीत अशा मुलांवर किंवा मुलींवर अंकुश बसावा यासाठी शासनाने २००७ मध्ये जेष्ठ नागरिक कायद्याची निर्मिती करुन त्याची अमंलबजावणी २०१० पासून करण्यात येत आहे. आई /वडिलांचा उतार वयात सांभाळ करणे कायद्यान्वये बंधनकारक आहे.
मात्र तरीही काही मुले किंवा मुली त्यांच्या आई-वडिलांचा उतार वयात सांभाळ करण्यास नकार देतात असे मुले किंवा मुलींविरुध्द् फौजदारी गुन्हा दाखल केला जातो.
नुकतेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉल येथे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील आई वडील व जेष्ठ नागरिक कल्याण संस्था जेष्ठ नागरिक यांचा जेष्ठ नागरिक छळ प्रतिबंध प्रबोधन मेळावा आयोजीत करण्यात आला होता.
सदर बैठकीस अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार विजय पवार, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), नंदुरबार विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा संभाजी सावंत, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, महिला सेल येथील सहा.पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे तसेच आई वडील व जेष्ठ नागरिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष बारकु पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव अरविंद नांद्रे यांच्यासोबत जिल्ह्यातील २० ते २५ जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सदर बैठकीस उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिकांची आपुलकीने विचारपुस करुन जागेवर जावून पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तसेच जेष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी ऐकून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सदैव आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले.
त्याचप्रमाणे संकटकालीन परिस्थितीत जेष्ठ नागरिकांना पोलीसांची मदत मिळणेबाबत कायदेशीर मार्गदर्शनही केले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार हाती घेतल्यापासून त्यांनी राबविलेले विविध उपक्रम तसेच जेष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कामाचे कौतुक करुन जेष्ठ नागरिक संघटनेचे बारकु पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे आभार व्यक्त केले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जेष्ठ नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन केला असून जेष्ठ नागरिकांच्या काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्यांनी जेष्ठ नागरिक कक्ष येथे येवून आपल्या समस्या मांडाव्यात निश्चीतच त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करुन समस्या सोडविल्या जातील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी यावेळी सांगितले.








