नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त पोलीस कवायत मैदान नंदुरबार येथे सामूहिक योगाचे आयोजन करण्यात आले होते.
” सूर्य ” हा सर्व शक्तीचे प्रतिक मानला जातो . दि. 21 जुन रोजी वर्षातील सूर्याची किरणे सर्वाधिक काळ पृथ्वीवर पडतात तसेच याच दिवशी सुर्याचे दक्षिणायन सुरु होते .
म्हणुन 21 जून या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे . सन 2014 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्व नेत्यांसमोर योगाचे महत्व पटवून देवून 21 जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करणेबाबत आवाहन केले होते .
त्यानंतर तीन महीन्यांनी संयुक्त राष्ट्र संघाने ठराव पारित करुन 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली . मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे .
इतर शारीरिक व्यायाम प्रकारांबरोबर योग या व्यायाम प्रकारास साऱ्या जगात मान्यता मिळाली आहे . योगामुळे मानवी जीवनात शारीरिक , मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येतात .
योगामुळे शरीर व मन तंदुरुस्त ठेवण्यास मदत होवून माणसाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते . योगा आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतासह संपूर्ण जगात दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो .
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस दल , जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस कवायत मैदान , नंदुरबार येथे सामुहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते .
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनी काल नंदुरबार जिल्ह्यातील जनतेस जास्तीत जास्त संख्येने जिल्हा पोलीस कवायत मैदान , नंदुरबार येथे आयोजित सामुहिक योग प्रात्यक्षिकासाठी हजर राहण्याबाबत आवाहन केले होते . त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देवुन पोलीस विभाग , महसूल विभाग व आरोग्य विभाग यातील अधिकारी व कर्मचारी तसेच नंदुरबार शहरातील विविध शाळा कॉलेजातील एकुण 240 ते 300 नागरिक सामुहिक योग प्रात्यक्षिकास उपस्थित होते .
सकाळी 7 वाजता जिल्हा पोलीस कवायत मैदानावर दोन सत्रात सामुहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते . पहिल्या सत्रात आनंद योग नॅचरोपॅथी हेल्थ सेंटरचे योग निसर्गोपचार तज्ञ चंद्रशेखर आनंदराव वसईकर , व केसरसिंग क्षत्रिय यांनी निसर्गोपचारातुन योग साधना याबाबत मार्गदर्शन केले . तसेच श्री. वसईकर यांनी नैसर्गिक योग साधनेचे महत्व समजावून सांगुन उपस्थितांकडुन योगाचे प्रात्यक्षिक करुन घेतले .
दुसऱ्या सत्रात सहजयोग साधनेचे मुख्य प्रशिक्षक डॉ .हितेश शाह व प्रियंका साळुंखे यांनी मानवी शरिराच्या विविध अवयवात असलेल्या शक्ती केंद्रांचे महत्व समजावुन सांगुन सहजयोग साधनेतुन त्या केंद्रबिंदुचा वापर करुन मानसिक स्वास्थ कसे मिळवले जावु शकते .
याचे महत्व सांगुन त्याचे प्रात्यक्षिक उपस्थितांकडून करवून घेतले . सदरचा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री , जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , व नंदुरबार जिल्ह्याचे शल्य चिकीत्सक चारुदत्त शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .
कार्यक्रमासाठी या मान्यवरांसह पोलीस , महसुल व आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचारी तसेच नंदुरबार शहरातील विविध शाळा कॉलेजातील तरुण – तरुणी सहभागी झाले होते .