नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार पोलीस दल , महसूल विभाग व जिल्हा रुग्णालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त पोलीस कवायत मैदान येथे सामूहिक योगाचे आयोजन करण्यात आले आहे.नागरिकांनी सहभागी होण्याच्या आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे .
मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे . योगामुळे मानवी जीवनात शारीरिक , मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येतात . योगामुळे शरीर व मन तंदुरुस्त ठेवण्यास मदत होवून माणसाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते . योगा आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतासह संपूर्ण जगात दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो .
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस दल , महसूल विभाग व जिल्हा रुग्णालय विभाग हे एकत्रीतरीत्या दि.21 जुन 2022 रोजी सकाळी 6.45 वाजता पोलीस कवायत मैदान , पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे.
सदर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त आयोजित सामूहिक योगाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री , नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , नंदुरबार जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ . चारुदत्त शिंदे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस दल , महसूल विभाग व जिल्हा रुग्णालय विभाग येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत .
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अनेक शासकीय , खाजगी शाळा , महाविद्यालय तसेच इतर ठिकाणी योगाविषयी विविध आसने ( प्रात्याक्षिक ) दाखवून , योगविषयी व्याख्याने आयोजित करुन योगाविषयी जनजागृती करण्यात येते .
अनेक कारणांमुळे माणसाचे वैयक्तीक आरोग्याकडे दूर्लक्ष होते त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या व्याधी होवून शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते . आरोग्य जर उत्तम राहिले तरच आपण आपले कर्तव्य चोखपणे पार पाडू शकतो म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून नियमितपणे योगा करावा .
शरीरयष्टी चांगली ठेवण्यासाठी योगा करणे गरजेचे आहे . त्याचप्रमाणे दररोज योगा केल्याने होणारा मानसिक ताण तणाव देखील दूर होतो , नियमीत योगा केल्याने स्वास्थ्यावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो .
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दि.21 जुन 2022 रोजी सकाळी 6.45 वाजता पोलीस कवायत मैदान , पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त आयोजीत केलेल्या सामूहिक योगासाठी उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे .