नंदूरबार l जीवन माळी
तालुक्यातील शेजवा येथील नंताविस संचलित माध्यमिक विद्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिरोध जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तु पाटील होते.
यावेळी त्यांनी डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया या रोगाविषयी माहिती दिली. त्यात आरोग्यम् धनसंपदा म्हणजे सर्वात महत्त्वाचे आरोग्य आहे त्याविषयी काळजी घेणे, नियमीत व्यायाम करणे व दुषित पाण्यापासून होणार्या आजारांवर नियंत्रण ठेवणे याविषयीचे मार्गदर्शन केले.
शाळेचे उपशिक्षक विजय पवार यांनी सांगितले, पावसाळा सुरू झाला की हे रोग घराघरात पसरतात. त्याला प्रतिरोध म्हणून काही उपाय आपण घरच्या घरी करू शकतो. त्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे, पावसाचे पाणी साचू देऊ नये व महत्त्वाचे म्हणजे साचलेल्या पाण्यात (डबक्यात) घरात शिल्लक असलेले गाडीचे इंजिनऑईल टाकणे जेणेकरून डास अंडी घालणार नाही व त्यांची उत्पत्ती थांबेल याविषयी मार्गदर्शन केले.

पिंपळोद उपकेंद्राचे आरोग्यसेवक महेंद्र वळवी यांनी आरोग्य शिक्षणातून देण्यात येणारे काही उपाय सुचवले. यात घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी आठवड्यातून एक दिवस रिकामी ठेवणे. घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवणे. निरुपयोगी व टाकाऊ वस्तू घराच्या छतावर आणि परिसरात ठेवू नये.
साचलेल्या पाण्याच्या साठ्यांमध्ये गप्पी मासे सोडल्याने डासोत्पत्ती रोखली गेल्याने हिवतापाचा प्रसार आणि पर्यायाने जोखीम कमी करण्यास मदत होते, असे सांगितले. यावेळी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराची प्रतिरोध प्रतिज्ञा सामुहिक पध्दतीने घेण्यात आली.
यावेळी शाळेचे उपशिक्षक दीपक वळवी, रामानंद बागले, संजय बोरसे, श्रीमती अरुंधती शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले.
आभार शाळेचे उपशिक्षक हरुणखॉ शिकलीगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय वसावे, दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली.








