नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार ते सारंगखेडा मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी विविध गावातील नागरिकांनी केली असून याबाबतचे निवेदन आगारप्रमुखांना देण्यात आले.बस सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आगारप्रमुखांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून वैश्विक महामारी मुळे तसेच त्यानंतर एस. टी. कर्मचाऱ्यांचा संपामुळे तमाम खेड्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.या काळात (वैश्विक महामारी च्या काळात)विद्यार्थी व पालक फारच ताणतणावात होते.
परंतु सुदैवाने आता वातावरण अनुकूल असल्याने तसेच नवीन शैक्षणिक वर्षे 2022-23 सुरू झाल्याने नंदूरबार ते सारंगखेडा मुक्कामी बस त्वरित दोन दिवसांत सुरू करावी अशी मागणी नंदूरबार तालुक्यातील मांजरे, बह्याने,कोपर्ली, ओसर्ली, होळ आणि भालेर गावातील विद्यार्थी-पालक यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सारंगखेडा मुक्कामी बस येणाऱ्या दोन दिवसांत सुरू केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याला संबंधित नंदुरबारच्या एस. टी. आगारप्रमुख हेच जबाबदार राहतील असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बलराज पाटील ( मांजरे), दगा पाटील, विनोद रावल, कोपर्लीचे सरपंच
विनोद वानखडे, पंकज मराठे, अरुण अहिरे, प्रशांत गिरासे, मुकेश बिरारे आदींची स्वाक्षरी आहे.