नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील दोंदवाडा शिवारात आज दि.18 जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान वीज पडून शेत रखवालदारचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
शहादा तालुक्यातील फेस येथील रहिवासी अर्जुन सोमजी पाटील यांचे शेत दोदंवाडे ता.शहादा येथे आहे. सदर शेत सायसिंग वळवी (वय २५) हा नफ्याने करीत होता.दि. १८ शनिवार रोजी 5.30 वाजेच्या सुमारास वीज व वाऱ्यासह दमदार पावसाने सुरुवात झाली होती.
सायसिंग केचका तडवी व पत्नी ईमा सायसिंग व सासू रतनी गोमता पाडवी व शेतमजूर ईश्वर नथ्थू चौधरी रा. फेस हे शेतात काम करीत असल्याने पावसाच्या व विजेचा अंदाज बघून शेतातील झोपडीत थांबलेले होते.तेवढ्यात मोठ्या विजेचा आवाज झाला. त्यात वीज पडल्याने सायसिंग केचका वळवी (वय २५) याचा मृत्यू झाला. तर शेतमजूर ईश्वर नथू चौधरी हा गंभीर जखमी झाला. जखमी चौधरी यांना ग्रामस्थांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनास्थळी जाऊन घटनेच्या पंचनाम्याचे आदेश दिले.
घटनास्थळी वडाळी बीटचे मंडळ अधिकारी विजय सावळे, तलाठी महेश ठाकरे वडाळी, निलेश मोरे बामखेडा यांनी घडलेल्या पंचनामा केला.तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक , भगवान कोळी, यांनी ही घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृत्यू पडलेल्या सायसिंग याचावर शवविच्छेदन करण्यासाठी सारंगखेडा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.या घटनेने मयताच्या पत्नीस शासकीय मदत मिळावी म्हणून जमलेले आदिवासी बांधवांनी शासनाकडे मागणीची अपेक्षा व्यक्त केली आहे.