नंदुरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील पिंपळा गावातील रहिवासी
वैशाली तापीदास गावित या विद्यार्थिनीची आत्महत्या होती की घातपात करण्यात आला याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.याबाबत त्यांनी नंदुरबार निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, नवापुर तालुक्यातील पिंपळा गावातील रहिवासी वैशाली तापिदास गावीत हि विद्यार्थिनी दोंडाईचा येथील अहिंसा पॉलिटेक्निक कॉलेज, दोंडाईचा येथे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होती.

शिक्षण घेत असतांना दोंडाईचा येथे कॉलेजमध्ये दि. १५ जून २०२२ रोजी सुमारे दुपारी ४:३० वाजता आत्महत्या झाल्याची माहिती परिवाराला मिळाली होती. परंतु आई वडील घटनास्थळी गेले असता सदर मयताचे प्रेत फासावर नसून खाली जमिनीवर होते. त्यामुळे आई-वडील व नातेवाईकांना वैशाली ने आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत शंका आहे.
सदर मयताचे पोलीस चौकशी झालेली दिसून येत नाही. मयत मुलगी वैशाली तापीदास गावीत हिची आत्महत्या की घातपात झाला याबाबत प्रश्न उपस्थित होत असून याची संपूर्ण चौकशी करून परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईक व गावातील नागरिकांनी नंदुरबार निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देऊन केली आहे.
यावेळी पिंपळा गावातील नागरिक फिलीप शंकर गावीत, लाजरेश मलमजी गावीत, प्रिवेंद्र सुभाष वसावे, कैलास गावीत, सुधाकर देविदास गावीत, अजय नामदेव गावीत, अविनाश राजेसिंग गावीत, सुभाष दत्तू गावित आदी उपस्थित होते.








