नंदुरबार | प्रतिनिधी
कोरोनामूळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडलेली उधना – पाळधी व उधना – नंदुरबार या दोन मेमो रेल्वे दि.१७ ऑगस्टपासून नियमित सुरू होणार आहेत . यामुळे खान्देशातील प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे .
कोरोना काळात सुरत – भुसावळ दरम्यानच्या अनेक प्रवासी रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या . त्यातीलउधना – पाळधी व उधना – नंदुरबार या दोन रेल्वेंचा समावेश होता . गरीब , सामान्य प्रवाशांसाठी , तसेच दररोजये जा करणार्या प्रवाशांसाठी या रेल्वे मोठ्या सोयीच्या होत्या . कोरोना काळात अर्थात मार्च महिन्यात या रेल्वेगाड्या स्थगित करण्यात आल्या होत्या . आता दि.१७ ऑगस्टपासून त्या नियमित सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले . उधना – पाळधी ही मेमो ट्रेन दररोज दुपारी १२.४५ वाजता उधनाहुन निघेल ,तर पाळधीला रात्री सव्वा आठ वाजता पोहोचेल . पाळधीहून रात्री पावणेनऊ वाजता निघून उधनाला पहाटे पावणेपाच वाजता पोहोचेल . उधना – नंदुरबार ही मेमो ट्रेन उधनाहून सायंकाळी सव्वा पाच वाजता निघेल , तर नंदुरबारला रात्री साडेदहा वाजता पोहोचेल.नंदुरबारहून पहाटे पाच वाजता निघून उधनाला सकाळी साडेनऊ वाजता पोहोचेल.