नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हाभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसापासून शहादा, तळोदा, धडगाव, नवापूर, अक्कलकुवा, तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी दिल्याने शेतकरी सुखावले आहेत.
मुसळधार पावसामुळे धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे व झाडांचे नुकसान झाले आहे. शहादा शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
धडगाव तालुक्यातील सोनबुद्रुक, सोन खुर्द, खडक्या, भानोली आणि छापरी गावाला वादळी वाऱ्याचा फटका बसला असुन गावात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गावातील झाडे, अनेक घराची कौल आणि घरे पडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तर घराजवळ लावलेल्या ओजाऱ्या पावरा यांच्या ट्रॅक्टरवर व काळुसिंग पावरा यांच्या बोलेरो वाहनावर घराची लाकडे आणि कौल पडून वाहनांचे नुकसान झाले गावात मोठ-मोठी आंब्याची झाडे, फांद्या, महुची झाडे उन्मळून पडली आहे. छापरी गावांतील आबला पावरा यांचे पूर्ण घर पडून संसार उघड्यावर पडला आहे. प्रशासकीय पातळीवरून या सर्व नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी आशी मागणी गावकरी करीत आहे.