म्हसावद l प्रतिनिधी
काल दि 11 जून रोजी दुपारच्या सुमारास अक्कलकुवा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाल्यामुळे शेतशिवारातील शाळेच्या इमारतीचे अतोनात नुकसान झाले.
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी काल संध्याकाळी वादळवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धडगाव संचलित देवमोगरा पुनर्वसन(मांडवा) अनुदानित आश्रमशाळेच्या इमारतीचे पत्रे उडून लाखोंचे नुकसान झाले.
देवमोगरा पू. ता अक्कलकुवा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा असून सुमारे सहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु काल आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अधिक्षक गृह,
कोठी गृह व प्राथमिक व माध्यमिक वर्ग भरत असलेल्या इमारतीचे पत्रे उडाली त्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे, शासन व प्रशासनाने त्वरीत लक्ष्य देऊन इमारत दुरुस्ती करावी जेणेकरून चालू शैक्षणिक हंगामात वर्ग भरण्यास सोयीस्कर होईल.
काल आलेल्या वादळाने आमच्या अनुदानित आश्रमशाळेचे अधीक्षक गृह, कोठी गृह व प्राथमिक व माध्यमिक वर्ग भरत असलेल्या इमारतीचे पत्रे उडाले, त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे,
ही शाळा पाच वर्षांपूर्वी स्थलांतर करून येथे आणली, संस्था अध्यक्ष व कर्मचारी यांनी निधी गोळा करून इमारतीचे बांधकाम केले होते परंतु आज आलेल्या वादळाने पक्क्या इमारती वरचे पत्रे उडाल्याने 15 जून पासून शाळा उघडल्यावर विद्यार्थीसाठी असलेले धान्य कुठं भरावे व वर्ग कुठं सुरु करावेत?
असा प्रश्न आमच्या समोर उभा आहे तरी शासनाने व प्रशासनाने त्वरीत याची दखल घेऊन आम्हाला मदत करावी जेणेकरून शाळा सुरळीत सुरु होण्यासाठी मदत होईल.
-डी एन गोसावी(प्राथमिक मुख्याध्यापक, अनुदानित आश्रमशाळा, देवमोगरा पू. ता अक्कलकुवा )