नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी झालेल्या पावसात नदीच्या पुरात पिकप वाहन, मोटर सायकल व शेती उपयोगी पाणी पाईप वाहून गेल्याची घटना घडली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काल संध्याकाळ पासून रात्री उशिरापर्यंत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील टाकली, घोडमाग, अक्राणी, केलापाणी, थेवापाणी, सीतापावली, बंधारा, राणीपूर, जमोणीपाडा, तोलाचापाडा, वरपाडा, कोठार, सावरपाडा या गावांमध्ये तासभर वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली होती.
पावसामुळे येथील डोंगर दऱ्यातील नद्यांना पहिल्याच पावसात पूर आला होता. पुराच्या पाण्यात घोडमाग येथील रहिवासी कांतीलाल पटले यांची दुचाकी वाहन व गायमुख येथील चालक मिथुन यांचे पिकप वाहन पुरामध्ये वाहून गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक पुराचा प्रवाह आल्याने वाहने सोडून चालक नदी बाहेर पळाल्याने जीवित हानी झालेली नाही. यासोबत नदीकिनारी असलेल्या शेतीपंपाचे पाईप वाहून गेले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी विद्युत तारा बाधित झाल्याने वीज प्रवाह खंडित करण्यात आलेला आहे. पाऊस व पुरामुळे डोंगरदऱ्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी अनेक गावांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेती कामांना सुरुवात होणार आहे; मात्र जिल्ह्यातील नवापूर, शहादा, नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांमध्ये अद्याप पाऊस झालेला नाही. सपाटी भागातील नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे.