नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे व्हॉट्सॲप स्टेटसवर विशिष्ट एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जावुन दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस आढळून आल्याने पोलिसांनी एका युवकास अटक केली आहे.
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांपासुन ते वयोवृध्द व्यक्ती ह्या सोशल मीडियाचा वापर करतांना दिसुन येत आहेत . सोशल मीडियाचा वापर करुन वेळेची बचत तसेच चांगले लेख , व्हिडीओ व्हिडीओ प्रसारीत करुन चांगले संदेश देता येतात परंतु सोशल मीडिया वरुन काही लोक दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट ,
लेख लिहुन जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न करतात . म्हणुन सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातुन पोस्ट करतांना सामाजिक भान ठेवावे व कोणतीही पोस्ट सोशल मीडियावरुन ( फेसबुक , इंन्स्टाग्राम , ट्विटर व व्हॉट्सॲप ) प्रसारीत करतांना ती पोस्ट आक्षेपार्ह आहे अगर कसे ? बाबत खात्री करुन मगच प्रसारीत करण्याची काळजी घ्यावी . आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणाऱ्या इसमाविरुध्द भारतीय दंड संहिता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 ( IT ACT 2000 ) प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सायबर सेल यांचेकडुन वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे वारंवार नागरीकांना आवाहन करण्यात आले होते .
तरी देखील दि. 8 जून 2022 रोजी सायंकाळी 7 वाजेचे सुमारास नंदुरबार शहरात राहणारा गणराज एअरटेल नावाच्या व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सॲपवर मुस्लीम धर्माचे प्रेशीत मोहम्मद पैगंदर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करुन विशिष्ट एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जावुन दोन धर्मात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आक्षेपार्ह स्टेटस ठेवले असल्याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने
त्यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सदर बाब सांगून संबंधीत इसमावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले . त्याप्रमाणे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक , किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांना बोलावुन सदरची घटने बाबत इत्थंभूत माहिती देवून संशयीत इसमास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले .
त्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार यांनी तात्काळ संशयीत इसमाचा नंदुरबार शहरात शोध घेवुन त्यास गुरुकुल नगर परिसरातून गजानन ऊर्फ गणराज भास्कर कुवर अटक केली. त्यानंतर त्याचा मोबाईलचे निरीक्षण केले असता त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर विशिष्ट एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जावुन दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस दिसून आले . ताब्यात घेण्यात आलेल्या गजानन ऊर्फ गणराज भास्कर कुवर याचा मोबाईल जप्त करुन त्याच्याविरुध्द
विशिष्ट एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जावुन दोन धर्मात तेढ निर्माण करणारे स्टेटस व्हॉट्सॲप ठेवले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 295 ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडी घेतली आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) अति . कार्यभार उप विभागीय पोलीस अधीकारी , नंदुरबार विश्वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , पोलीस उप निरीक्षक , स्नेहदिप शिंदे व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या पथकाने केली आहे .
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , फेसबुक , इंन्स्टाग्राम , व्हॉट्सऍप , ट्विटर व इतर सोशल मीडियावर धार्मीक भावना भडकविणाऱ्या दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर स्टेटस ठेवू नये . तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये . आक्षेपार्ह व्हिडीओ , पोस्ट प्रसारित करतांना कोणीही आढळुन आल्यास त्याच्याविरुध्द् व संबंधित ॲडमिनवर कठोर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच आक्षेपार्ह मजकुराबाबत कोणालाही माहीती प्राप्त झाल्यास त्वरीत नजिकच्या पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार येथे देण्यात यावी असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी आवाहन केले आहे .