नंदुरबार l प्रतिनिधी
येत्या खरीप हंगामासाठी 75 ते 100 मि.मि पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
सोयाबीन पेरणीसाठी स्व: उत्पादीत चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावेत. पेरणीसाठी प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीचा किंवा प्लांटरचा वापर करावा.
सोयाबिनची उगवण क्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी.
रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे व नंतर बियाण्याची 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी.