नंदुरबार l प्रतिनिधी
प्रेमविवाह केल्याच्या कारणावरुन नंदुरबार तालुक्यातील अमळथे येथे वाद निर्माण झाला. यात परस्पर फिर्यादीतून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तालुक्यातील अमळथे येथील पंकज ईश्वर मोरे याने शिंदखेडा तालुक्यातील विटाई येथील एका मुलीशी प्रेमविवाह केला होता.
याचा राग आल्याने दि.३ जून रोजी विटाई येथील रावण रामदास बाविस्कर, संदिप रावण बाविस्कर, प्रशांत जिजाबराव बाविस्कर व दभाशी येथील सिद्धार्थ रविंद्र चव्हाण, गणेश दगा वाघ तसेच संदिप पिरन बैसाणे अशा सहा जणांनी
अमळथे येथील पंकज मोरे यांच्या घरात प्रवेश केला. पंकज मोरे यांच्या पत्नी हिला घरातून घेऊन जात असतांना ती जात नसल्याने तिला रावण बाविस्कर यांनी गालावर चापट मारली.
यावेळी पंकज मोरे यांचा भाऊ गोविंद ईश्वर मोरे हा मध्यस्थी आल्याने घरातील लाकडी डेंगाऱ्याने त्याच्या पायावर व डोक्यावर मारले. यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
तसेच पंकज मोरे यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरुन विटाई व दभाशी येथील सहा संशयितांविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२५, ३२४, ४५२, ५०४, ५०६, १४३, १४७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अनिल सोनवणे करीत आहेत.
तर याप्रकरणी रावण रामदास बाविस्कर यांनी दिलेल्या परस्पर फिर्यादीत म्हटले आहे की, ईश्वर मोरे यांनी लग्नाची बोलणी करण्यासाठी व मुलीला घेवून जाण्यासाठी अमळथे येथील त्यांच्या घरी बोलावले होते.
यावेळी रावण बाविस्कर हे पाच ते सहा जणांसोबत पंकज मोरे व ईश्वर मोरे यांच्या घरी गेले असता बाविस्कर यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली.
तसेच बाविस्कर व त्यांच्यासोबतच्या पाच जणांना गावातून जाण्यासाठी अटकाव केला. याबाबत पंकज मोरे, ईश्वर मोरे, पंकज गोविंद मोरे व मनोहर मोरे अशा चौघांविरोधात रावण बाविस्कर यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात कलम ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. पुढील तपास पोना.गुलाबसिंग वसावे करीत आहेत.