नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात लघुशंकेच्या कारणावरुन दोन गटांत वाद निर्माण होवून दि.९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास तुफान दगडफेक झाली .यावेळी पोलीसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली . जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी तीन अश्रुधूरांच्या नळकांड्यांचा फोडल्या.याप्रकरणी दोन्ही गटातील ३३ जणांविरूध्द सोमवारी रात्रीच उशिराने गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक करण्यात आली होती . दरम्यान , काल दि.१० ऑगस्ट रोजी पुन्हा दुपारच्या सुमारास दगडफेक करत वाहने जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेवून वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. रात्री उशिरापर्यंत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात काल आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असून यातील १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिस्मील्ला चौक येथे काल दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास एका घराजवळ एक इसम लघुशंका करीत असतांना एकाने त्याला हटकले. त्यावरून वाद झाला. पाहता पाहता त्या वादाने दंगलीचे रौद्ररूप धारण केले. दोन्हीकडून दगड, विटा, बाटल्यांचा पाऊस सुरू झाला. सदर धुमचक्री तासभर चालली. यावेळी त्याठिकाणी पोलीसदल दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला असता. पोलीसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलीसांनी तीन आश्रुधुराचा नळकांडया फोडल्या. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. बिस्मील्ला चौकात गैरकायद्याची मंडळी जमवून एकमेकांवर दगडफेक करून जमाव पांगविण्यासाठी पोलीस त्याठिकाणी पोहोचले असता पोलीसांच्या गाडीवर दगडफेक व विटांचे तुकडे मारून फेकले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला व जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून याप्रकरणी पो.कॉ. इम्रान खाटीक यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्रीच ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक करण्यात आली होती.
नंदुरबार शहरात रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतरदेखील काल दि. १० रोजी दुपारी एका गटातील काही जणांनी पुन्हा त्या परिसरात पोलिस बंदोबस्त असतांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.दोन दुचाकी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला . याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्ह्यातील संशयितांमध्ये गोविंद यशवंत सामुद्रे , गोपी यशवंत सामुद्रे , आकाश रवींद्र अहिरे , दीपक शाम ठाकरे , विश्वजीत संजय बैसाणे , गौतम मंगलसिंग खैरनार या सहा जणांना अटक करण्यात असून तर मुकेश मधुकर ठाकरे , नागो अशोक ठाकरे , अक्षय अनिल वळवी , रवी उर्फ बाला जाधव , भटू गोरख जाधव , वंकर रतीलाल ठाकरे , शंकर रतन ठाकरे , शेखर रमेश जाधव , जिबला दिलीप वळवी , सचिन शामा ठाकरे , डेबू राजेश ठाकरे , राकेश राजेश ठाकरे , राहुल श्याम ठाकरे व इतर सात ते आठ जणांचा शोध घेण्यात येत आहे.काल सायंकाळी अब्दुल्ला खान बिस्मिल्ला खान पठाण यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सदर संशयितांविरोधात भादंवि कलम १४३,१४७,१४ ९ , ४३५,३३६,४२७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान , काल जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित , उपअधिक्षक देवराम गवळी , स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर , शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अर्जुन पटले यांनी शहरात स्वतः फिरून शांततेचे आवाहन केले . तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले . काल दि.१० ऑगस्ट रोजी रात्रीपर्यंत याप्रकरणी पोलीसांनी एकूण १२ जणांना अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध घेण्यात येत आहे . शहरात आता शांतता असून कडक पोलिसं बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .