नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील ठाणेपाडा, गंगापुर या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुझलॉन कंपनीने रस्त्यावर पोल बसविले आहेत ते हटविण्यात यावेत याबाबतचे निवेदन पवनऊर्जा जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आदिवासींच्या जमिनी खरेदी करता येत नसून देखील सुझलॉन कंपनीने बेकायदेशीररित्या काबीज केल्या आहेत.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा, गंगापुर व परिसरातील असंख्य आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर सुझलॉन व सर्जन रियालिटीज या कंपनीने कुठलीही परवानगी न घेता महाकाय टॉवर उभे केले आहेत.
तसेच सुझलॉन कंपनीने तयार केलेल्या रस्त्यांवर जिल्हा परिषदेने संबंधित शेतकऱ्यांची परवानगी न घेता डांबरीकरण रस्ते तयार केलेले आहेत. त्याचीही चौकशी व्हावी,
याबाबतीत मागील आठवड्यात निवेदन ही दिले होते. त्याचीही आपल्या विभागाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. येत्या आठ दिवसात संबंधित विभागाने याची दखल न घेतल्यास रस्त्यावर तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर पवन ऊर्जा जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे, गोकुळदास ठाकरे, बिनाबाई अहिरे, रमेश भिल, श्रीराम पवार , गोपीचंद पवार, धर्मा पवार, मयू पवार, चमारू पवार, रामसिंग ठाकरे,रामचंद्र ठाकरे सुंदर बाई पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.








