नंदुरबार l प्रतिनिधी
नाट्यकला ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आकार देण्याचे प्रमुख साधन आहे. यातून बाल कलावंतांना भाषा संस्कृतीची व समाजाच्या विविध रुपांची ओळख होईल.
भविष्यात नंदुरबार येथे बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केल्यास येथील नाट्य चळवळीला गती प्राप्त होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनचे नाट्यकला निदेशक तथा प्रशिक्षक आसिफ शेख अन्सारी यांनी केले. ते बालनाट्य महोत्सवाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची सांगता येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे बालनाट्य महोत्सवाने झाली.
या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, चिंतामणी महिला एज्युकेशन संस्थेचे सचिव युवराज पाटील, हस्ती पब्लिक स्कुलचे चेअरमन कैलास जैन, पत्रकार तथा साहित्यीक रमाकांत पाटील, बाल रंगभूमी परिषद बिड जिल्हा शाखेचे जिल्हा समन्वयक विलास सोनवणे, राजे शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
या बालनाट्य महोत्सवात एकुण २५ बला कलावंतांनी सहभाग घेतला. या महोत्सवात आसिफ अन्सारी लिखित ‘माणूस माणूस प्राणी, प्राणी-प्राणी माणूस’, ‘जय हो फॅन्टसी’, ‘ओसामा’, ‘कस्तुरी’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे..?’ हे बालनाट्य सादर झाले.
या बालनाट्याच्या समारोपप्रसंगी जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा आयोजन समितीतर्फे दिला जाणारा मानाचा दिपस्तंभ हा पुरस्कार पत्रकार तथा साहित्यीक रमाकांत पाटील यांना ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी रमाकांत पाटील म्हणाले की, आयुष्यात अनेक पुरस्कार मिळालेत, मात्र आपल्या माणसांनी दिलेल्या पुरस्काराचे मोल काहीच औरच असते. कैलास जैन म्हणाले की, बालनाट्य प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या पलिकडे विकास होणार. या माध्यमातून जीवनाकडे बघण्याची नवीन दृष्टी प्राप्त होईल. सोबतच नितीमुल्यांची शिकवण मिळते.
नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची सलग पाच बालनाट्य स्थानिक बालकलावंतांनी सादर केलीत. यावेळी बालनाट्य सादर करताना कलावंत मुला-मुलींचा दांडगा उत्साह होता.
यावेळी बालकलावंतांचा उत्साह वाढविण्यासाठी पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बालकलावंतांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
प्रास्ताविकेतून नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी बालनाट्य प्रशिक्षणासंदर्भात व भविष्यातील नाट्यचळवळीच्या उपक्रमासंदर्भात आपली भुमिका मांडली. सूत्रसंचालन तुषार ठाकरे यांनी तर आभार राहुल खेडकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिबिर प्रमुख राजेश जाधव, मनोज सोनार, राहुल खेडकर, तुषार सांगोरे, चिदानंद तांबोळी, जितेंद्र पेंढारकर, रविंद्र कुलकर्णी, आशिष खैरनार, गिरीष वसावे आदींनी परिश्रम घेतले.