नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांची रुंदी ११ ते १२ फुटापर्यंत कमी झाल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वाढत्या अतिक्रमणावर कार्यवाही करून वाहतुकीस अडथळा ठरणार्या बाबींचा विचार करीत रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात यावे.
तसेच अवजड वाहनांना सायंकाळी आठ वाजेनंतर ते सकाळी नऊपर्यंत नंदुरबार शहरात प्रवेश देण्यात यावा. अशा उपाययोजना करून शहरात एकेरी वाहतूक व वाहन पार्किंगचे नियोजन करण्याबाबतचे पत्र नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी नंदुरबार नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना दिले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी शहरातील प्रमुख रस्ते व चौक परिसरात जाऊन प्रत्यक्षरित्या वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली होती.
नंदुरबार शहरात वर्दळीचा चौक व रस्त्यांवर नेहमी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असतो. कमी भोगोलिक जागेवर शहर वसले असून सुमारे दीड लाखापर्यंत लोकसंख्या वाढली आहे.
प्रत्येकाजवळ दुचाकी झाल्याने वाहतुकीकरिता रस्त्यांवरील जागा मात्र कायमसाठी मर्यादित आहे. उपलब्ध जागेची परिस्थिती पाहता नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे शहरांमधून जाणार्या प्रत्येक रस्त्याची रुंदी ११ ते १२ फुटापर्यंत मर्यादित झाली आहे.
त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांचे वर्दळीच्या चौकांमध्ये वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असतो. म्हणून शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी वेळीच उपाययोजना होणे गरजेचे झाले आहे.
त्यासाठी नंदुरबार शहर वाहतूक शाखेने नंदुरबार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून नंदुरबार शहरात एकेरी वाहतूक व वाहन पार्किंग नियोजन करण्याबाबत कळविले आहे.
नंदुरबार शहरातील अंधारे चौक, शास्त्री मार्केट, हुतात्मा स्मारक चौक, नगरपालिका चौक, हाट दरवाजा, गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, अलीसाहब मोहल्ला, महात्मा फुले पुतळा, साक्री नाका, नेहरू पुतळा, गांधी पुतळा, रेल्वेस्थानक व बसस्थानक या प्रमुख रस्त्यांची रुंदी १० ते १२ फूट तर तर काही रस्तेची रुंदी ८ ते १० फूट व १५ ते १६ फूट असे अंदाजित मर्यादित आहे.
सदर रस्त्यांवर काही दुकानदारांनी अतिक्रमण वाढविले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच वर्दळीच्या चौकांमध्ये नेहमी अवजड वाहनांची वर्दळ असते त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.
म्हणून वाहतुकीच्या प्रश्न सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात यावे, शॉपिंग दुकानांसमोर पांढरे पट्टे मारण्यात यावे, अवजड वाहनांना सायंकाळी आठ ते सकाळी नऊपर्यंत शहरात प्रवेश देण्यात यावा,
काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, असे पर्याय अशी पर्यायी व्यवस्था नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी नंदुरबार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रातून सुचविली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी शहरातील प्रमुख रस्ते व चौक परिसरात जाऊन प्रत्यक्षरित्या वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली.