नंदुरबार l प्रतिनिधी
ऋषीमुनींच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीत विविध जाती-धर्माचे संत-महंत जन्मास आले. महाराष्ट्र भूमी मध्ये देखील थोर संत होऊन गेले. संतांच्या प्रेरणेतूनच समाज संघटन होत असते. भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्री भीमा भोई यांच्या सामाजिक प्रबोधनाची परंपरा युवा पिढीने कायम राखावी.
आपसातील मतभेद विसरुन राजकारण बाजूला सारून समाजाला एकसंघ करण्याचे आवाहन माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील कुठल्याही एका मुख्य चौकाला संत भीमा भोई नामकरण करून सुशोभिकरण करण्याचे आश्वासन चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले.
शहरातील बालवीर चौक नवा भोईवाडा परिसरात बुधवारी भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्री भीमा भोई यांच्या 171 व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन अभिवादन आणि सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते संतश्री भीमा भोई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक रवींद्र पवार, यशवर्धन रघुवंशी, दीपक दिघे, गजेंद्र शिंपी, चेतन वळवी, आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, निलेश माळी, नरेंद्र माळी, संतोष वसई कर, हरिचंद्र भोई, पोलीस कॉन्स्टेबल सुनील मोरे, आर. बी. वाडीले, सुरेश तावडे यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहून संत भीमा भोई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी संत भीमा भोई यांच्या कार्याला उजाळा दिला. संयोजकांतर्फे प्रमुख पाहुण्यांना संत श्री भीमा भोई यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. अभिवादन कार्यक्रमात अक्षदा पडण्यापूर्वी नवरदेव कृष्णा भोई याने देखील प्रतिमा पूजन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोई, उपाध्यक्ष जितेंद्र खेडकर,सचिव प्रताप सोनवणे, तसेच रामकृष्ण मोरे, डॉ. गणेश ढोले, पंचकमिटी अध्यक्ष चंद्रकांत खेडकर, संजय साठे, इंजिनीयर पंकज शिवदे, तुषार तावडे, तुकाराम मोरे, यांच्या सह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निळकंठ धनराळे यांनी केले.