तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथे धनादेश अनादरप्रकरणी एकास दोन लाख रुपये दंड व ११ महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
याबाबतीत रामचंद्र शंभू चौधरी रा.तळोदा यांना वाहिद उर्फ वायद दादामिया पठाण रा.तळोदा याने आपसातील हात उसनवारीतील व्यवहारापोटी १ लाख ५० हजार रुपयांचा मोती अर्बन बँक शाखा तळोदाचा धनादेश दि.२६ मार्च २०१३ रोजी दिला होता.
सदर धनादेश अनादरीत झाला. त्यामुळे दि.२८ ऑगस्ट २०१३ रोजी तळोदा फौजदारी न्यायालयात रामचंद्र शंभू चौधरी यांनी दावा दाखल केला होता. याप्रकरणी फिर्यादी, साक्षीदार व व्यवस्थापक, मोती अर्बन बँक शाखा तळोदा यांची साक्ष तपासून दिलेला धनादेश हा वाहेद दादामिया पठाण याचाच असून
धनादेश तारखेस धनादेश रक्कम रुपये १ लाख ५० हजार खात्यात रक्कम ठेवणे ही नैतिक व कायदेशीर जबाबदारी असल्याने व धनादेश अनादरनंतरही धनादेश रक्कम न आणून दिल्याने व ही बाब पुराव्यानिशी
न्यायालयात सिद्ध झाल्याने वाहिद उर्फ वायद दादामिया पठाण याला २ लाख रुपये दंड व १ महिन्याची साधी कैद व रक्कम न दिल्यास १ वर्षाची कैद अशी शिक्षा न्या.एस.डी.हरगुडे यांनी ठोठावली. फिर्यादीतर्फे ॲड.संजय पुराणिक व ॲड.संदीप पवार यांनी बाजू मांडली.








