नवापूर l प्रतिनिधी
शहरातील राष्ट्रीय महामार्ग वरील श्रीरंग अवधूत शाॅमिल जवळ इनोव्हा कारचा अपघात झाला आहे. समोरून भरधाव वेगाने येणारा टँकर अंगावर येईल की काय या भीतीने कार चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली असता गाडी पलटी झाली
या अपघातात एकाच कुटुंबातील चार चालक असे पाच जण जखमी झाले आहेत. अपघात होताच घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिक मदतीला धावून आले. या दरम्यान काही वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरतहून नवापूरला साईनाथ किराणाचे संचालक रतिलाल कन्हैयालाल अग्रवाल यांच्याकडे घरगुती कार्यक्रम निमित्त हे पाहुणे मंडळी आले होते. कार्यक्रम झाल्यावर नवापुरहून औरंगाबादला जात असताना त्यांचा नवापूर शहरानजीक श्रीरंग अवधूत शामिल जवळ सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास कार पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात चालक पवन पुरुषोत्तम पटवारी,नेहा भावेश अग्रवाल औरंगाबाद,राखी कपिल अग्रवाल रा चालीसगांव,लहन मुलगा ध्रुव भावेश अग्रवाल,भावेश योगेश अग्रवाल रा औरंगाबाद अग्रवाल कुटुंबातील चार सदस्य जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघात होताच गाडी पलटी झाल्याने प्रवाशांना गाडीचा काच फोडून बाहेर काढावे लागले.
मिळेल त्या साधनाने जवळील नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नवापूर तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे.अपघात कमी होण्यासाठी संबंधित प्रशासनाने ठोस उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.








