नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर ॲपेरिक्षा उलटल्याने महिलेचा मृत्यू झाला तर इतर प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, कुकरमुंडा तालुक्यातील राजपूर येथील रितेश लक्ष्मण वळवी हा त्याच्या ताब्यातील ॲपेरिक्षा (क्र.एम.एच.४१ सी ८९५०) अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाने जात होता. यावेळी आरटीओ चेकपोस्ट जवळील उतारावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन व वजनदार वस्तू भरलेली असतांनाही
रितेश वळवी ॲपेरिक्षाबाहेर डोके काढून थुंकत असतांना वरील ताबा सुटल्याने त्याचे ताब्यातील ॲपेरिक्षा साईडपट्टीवरुन रोडाच्या खाली उतारावर उलटल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात रिक्षातील सकीलाबाई दिनेश वसावा रा.काकडीआंबा ता.सागबारा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मोनिकाबेन, नितेश व जेरमाबाई यांच्यासह इतर प्रवाशांनाही दुखापत झाली.
तसेच ॲपेरिक्षाचेही नुकसान झाले. याबाबत पोहेकॉ.मोहन शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात चालक रितेश वळवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, ६६/१९२, ३ (१), १८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मोहन शिरसाठ करीत आहेत.








