नवापूर | श.प्र.-
तालुक्यातील चितवी येथील जि.प.पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षातील एकूण ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शनिवारी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे एकुण ११ उमेदवार निरवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार दिला असला तरी आघाडीचा घटक पक्ष कॉंग्रेसने मात्र, स्वतंत्र उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे भाजपाने उमेदवारी अर्जच दाखल केला नाही.
नंदुरबार जिल्हा परिषद चितवी गटाचे दिवंगत सदस्य सुरेश सुरूपसिंग गावित यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. चितवी गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि.१७ ते २३ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती.
या कालावधीत एकूण ११ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र नवापूर तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना निळे-ठुबे यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी तहसिलदार मंदार कुलकर्णी उपस्थित होते.
सुरुवातीच्या चार दिवसात एकही अर्ज दाखल झाला नाही. २१ मे २०२२ रोजी दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यात विशाल रमेश गावित, रा.वडसत्रा, यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवार अर्ज दाखल केला आहे.
तर गावित सोमू रावजी टाकलीपाडा वडसत्रा यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
गावित रवींद्र नकट्या (रा.चितवी, कॉंग्रेस व अपक्ष) असे दोन अर्ज दाखल केले. गावित किसन रतिलाल (रा. वागदी, कॉंग्रेस व अपक्ष) दोन अर्ज दाखल केले. गावित राजेंद्र सुरेश (रा.मोरकरंजा, अपक्ष) एक उमेदवारी अर्ज दाखल केला.
गावित सुनील सुरेश (रा. मोरकरंजा, राष्ट्रवादी पार्टी व अपक्ष) दोन उमेदवार अर्ज दाखल केले.
गावित सोमू रावजी (रा. टाकलीपाडा वडसत्रा) यांनी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवार अर्ज दाखल केला तर गावित निलेश नथू, रा.चोरविहीर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाविकास आघाडीने सुनील सुरेश गावित यांना अधिकृत उमेदवारी दिली असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, माजी आ.शरद गावित, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बकाराम गावित,
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक गावीत, नवापूर शहराध्यक्ष शरद पाटील, इद्रिस पठाण, शिवसेना शहरप्रमुख अनिल वारुळे, पं.स. सदस्य सुरेश गावीत, सुनील वसावे, मनोज वळवी, प्रदीप गावित आदी उपस्थित होते. कॉंग्रेस पक्षाची उपस्थिती मात्र दिसून आली नाही.








