नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील निजामपुर येथील महिलेचा खुनाचा उलगडा झाला असून शेतजमीन व दागिने लोभापायी बहिणीला जिवेठार मारणाऱ्या भावाला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत
याबाबत अधिक माहिती अशी की, साकुबाई सुपड्या वळवी (वय 65 ) रा . निजामपुर ता . नवापुर या पतीच्या निधनानंतर एकट्याच करुन आपला उदरनिर्वाह करत होते .
घरात कोणीही सांभाळ करणारे नसल्यामुळे साकुबाई अत्यंत हालाखीचे जीवन जगत होते . गावात त्यांचा फक्त भाऊ होता तो देखील साकुबाई यांचा सांभाळ करण्यास तयार नव्हता .
तरी देखील साकुबाई शेतीत मोलमजुरी करुन आयुष्याची गाडी पुढे ढकलत होत्या . दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी साकुबाई वळवी अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचा भाऊ पोसल्या नोगया वळवी रा . निजामपुर ता . नवापुर यांनी विसरवाडी पोलीस ठाणे येथे मिसिंग दाखल केली होती .
विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पथकांनी व भाऊ पोसल्या यांनी साकुबाई वळवी यांचा नातेवाईक व इतर ठिकाणी सर्वत्र शोध घेतला परंतु त्या मिळून येत नव्हत्या . दि.18 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास
विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील निजामपुर गावाचे शिवारात असलेल्या कोरड्या नाल्यात सुती गोणपाटाला दोरी बांधलेले असून त्यातून दुर्गंधी येत असल्याची प्राथमीक माहिती स्थानिक गावकऱ्यांनी विसरवाडी पोलीस ठाण्याला कळविली .
विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक श्री . नितीन पाटील व पोलीस अमंलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले नाल्यातील गोणपाटची दोरी सोडून पाहिले असता त्यात कुजलेले मानवी प्रेताची कवटी व हाडे असून जांभळ्या व केशरी रंगाचे लुगडे व लालसर रंगाचे ब्लाऊज दिसले .
सदरची माहिती समजताच पोलीस अधीक्षक श पी . आर . पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . गोणपाटात मिळून आलेले कुजलेले महिलेचे प्रेत कोणाचे ? तिला कोणी व का मारले असावे ? असे अनेक आव्हान पोलीसांसमोर होते .
पोसल्या नोगऱ्या वळवी यांना सदर बातमी कळताच ते देखील घटनास्थळी गेले व घटनास्थळावर मिळून आलेल्या कपड्यांवरून त्यांनी ते प्रेत त्याची बहिण साकुबाई सुपड्या वळवी हीचे असल्याचे ओळखले .
मयताची ओळख जरी पटली तरी तीस मारण्याचा उद्देश काय ? मारेकरी कोण ? असे आव्हान अजूनही पोलीसांसमोर होतेच . घडलेला प्रकार हा निश्चितच घातपाताचा असावा हे समजण्यास पोलीसांना वेळ लागला नाही .
घटनास्थळाची पाहणी करून मा.पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना खूनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करणेबाबत आदेशीत केल्याने पोलीस उप निरीक्षक भुषण विनायक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीताविरुध्द् खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता .
घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर व संवेदनशील होता . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , मा . अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे पथक तयार करुन आरोपी तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले .
घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होवू शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे , मोबाईल , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तू मिळून आलेली नव्हती .
ग्रामीण भाग असल्यामुळे सी.सी.टी.व्ही . चा प्रश्नच येत नव्हता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते . वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीस ठाण्याच्या अमलदारांचे मिळून वेगवेगळे 4 पथके तयार करुन पथक तपासासाठी रवाना करण्यात आले .
दि. 20 म 2022 रोजी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सुमारे 2 ते 3 महिन्यापूर्वी मयत साकुबाई हिचा भाऊ पोसल्या वळवी हा नंदुरबार येथे चांदीचे दागिने विकण्यासाठी आला होता .
मिळालेली बातमी अतिशय त्रोटक होती . पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सांगितली .
त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ मयत साकुबाई हिचा भाऊ पोसल्या वळवी यास ताब्यात घेणेसाठी पाठविले . मिळालेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निजामपुर ता . नवापुर येथून पोसल्या वळवी यास ताब्यात घेतले .
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास विचारपुस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी संशयीतास अत्यंत कौशल्यपुर्वक विचारपुस करुन संशयीताच्या त्याच्या विसंगत बाबी निदर्शनास आणून दिल्या व संशयीत आरोपी पोसल्या वळवी यास बोलते करुन घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली .
ताब्यात घेण्यात आलेला संशयीत आरोपी पोसल्या वळवी याने अतिशय धक्कादायक माहिती सांगितली की , मयत साकुबाई हो पोसल्या वळवी याची मोठी बहिण होती . तिला पती , मुल – बाळ वगैरे नव्हते . तसेच संशयीत पोसल्या वळवी याची पत्नी सतत आजारी असल्यामुळे तिच्या औषोधोपचारासाठी त्यास पैश्यांची आवश्यकता असायची .
तसेच संशयीत पोसल्या व मयत साकुबाई यांच्या जमीनीच्या हिस्स्यावरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होता सुमारे 2 ते 3 महिन्यापूर्वी मयत साकुबाई हिस रात्रीच्या वेळी तिच्या घरात जिवेठार मारून एका गोणपाटात टाकले व ते गोणपाट त्याने त्याच्या घरी आणून ठेवून दिले .
तसेच तिच्या अंगावरील दागीने हे नंदुरबार येथील सोनारास विकल्याचे सांगितले . काही दिवसानंतर प्रेताचा वास जास्त येत असल्यामुळे आरोपी याने ते प्रेत गावाच्या लगत असलेल्या कोरड्या नाल्यात टाकून दिले , अशा आशयाची माहिती दिली .
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी. आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक , नंदुरबार विजय पवार , उप विभागीय पोलीस अधीकारी , नंदुरबार सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर ,
सहा . पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी , पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे , महेंद्र नगराळे , विनोद जाधव , राकेश वसावे , पोलीस नाईक दादाभाई मासुळ , बापू बागुल , जितेंद्र ठाकुर , जितेंद्र तोरवणे , जितेंद्र अहिरराव , सुनिल पाडवी , पोलीस कॉन्सटेबल आनंदा मराठे , राजेंद्र काटके , अभिमन्यु गावीत , तुषार पाटील यांच्या पथकाने केली आहे .