शहादा l प्रतिनिधी
तालुक्यातील प्रकाशा गावाजवळील गोमाई नदी पुलाजवळ रात्री तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बहुरूपा येथील तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
अपघात घडताच याठिकाणी वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यावेळी पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली दरम्यान मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश करत रास्तारोको केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाशा गावापासून नजीकच असलेला गोमाई नदी पुलाजवळ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रात्रीच्या सुमारास तिहेरी अपघात झाला आहे.
यामध्ये सचिन प्रल्हाद पाटील (वय 39 राहणार लहान शहादा हल्ली मु. बहुरूपा ) यांचा अपघात जागीच मृत्यू झाला होता दरम्यान मयत व्यक्तीवर मसावद येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.अपघात एवढा भीषण होता की वाहनांचे ही नुकसान झाले आहे.
यावेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता. दरम्यान अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात सुरु होती. सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांवर होऊ लागली आहे या ठिकाणी छोटे-मोठे अपघात वारंवार होत असल्याने,
वाहन धारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. पुन्हा- पुन्हा तीच वाहनधारकांना प्रचिती येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रकाशा गाव व परिसरातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालावे.
अशी ही मागणी आता सर्वसामान्य नागरिक व वाहनधारकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. या घटनेमुळे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी प्रकाशा गोमाई पुलानजीक रास्तारोको करण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती.