नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत लेलन ट्रॉली खरेदी प्रकरणी गैरव्यवहार झाला असुन या सर्व प्रकरणी निपक्षपाती चौकशी करण्यात यावी,तसेच संबधितांवर गुन्हे दाखल करून तब्बल १३ लाख ४३ हजार ४ रूपये रक्कम जास्त दिली ती वसुल करा. अन्यथा कार्यालयासमोर दि.१० जुन पासुन आमरण उपोषण करण्यात येवुन भाजपातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आपणांकडे दि.१५ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री एंटरप्राईजेस नंदुरबार यांनी लेलन ट्रॉली खरेदी प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचे आपल्याकडे केलेल्या तक्रारीत नमुद केले होते. या अनुषंगाने आपले कार्यालयीन पत्रान्वये आपण जो खुलासा दिला आहे तो धांदात खोट असुन श्री एंटरप्राईजेस या ठेकेदाराला व संबंधित अधिकार्यांना वाचविणारा आहे. या सर्व प्रकरणी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके व स्टोर फार्मासिस्ट श्री.मराठे हे दोषी असुन याबाबत आपणांकडे पुनच्छ तक्रारीव्दारे पुरावे सादर करीत आहोत. आपण खुलासा केल्याप्रमाणे साठा रजिस्टर मधील साठा पुराव्याची नोंद दि.३१ मार्च २०२१ रोजी दाखविण्यात आली आहे. तसेच वित्त विभागाने दि.३१ मार्च २०२१ रोजी बिल अदा केल्याचे आपण म्हटले आहे. आपल्याकडे साठा हा दि.३१ मार्च २०२१ रोजी प्राप्त होतो आणि त्याच दिवशी म्हणजे दि.३१/०३/२०२१ रोजीच ठेकेदाराला बिल अदा केले जाते हे कसे शक्य आहे ? याचा खुलासा होणे आवश्यक आहे. अतिशय महत्वाची बाब म्हणजे श्री एंटरप्राईजेस या ठेकेदाराने हॉस्पी+मेनटेन यांच्याकडुन लेलन ट्राली साहित्य खरेदी केल्याची तारीख३० ऑगस्ट २०२१ ची आहे. श्री एंटरप्राईजेस या ठेकेदाराने जिल्हा परीषदेला जे साहित्य पुरवठा केलेले आहे ते अर्थात लेलन ट्रॉली ती केवळ २ लाख ८३ हजार २०० रुपयांत खरेदी करुन तीच लेलन ट्रॉली जिल्हा परीषदेला १६ लाख २६ हजार २०४ रुपयाला दिली आहे. यात श्री एंटरप्राईजेसने तब्बल १३ लाख ४३ हजार ४ रुपये ऐवढे नुकसान करून अक्षरश: लुटच आहे. असे असतांना जो खुलासा दिला आहे तो शुध्द खोटा, भ्रष्टाचार करणार्या अधिकार्याला पाठीशी घालणारा आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. या सगळया प्रकरणात आपल्या कार्यालयाचाही सहभाग आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणी निपक्षपाती चौकशी दोषींवर कार्यवाही करा, गुन्हे दाखल करा व तब्बल १३ लाख ४३ हजार ४ रूपये जास्त दिली ती वसुल करा. अन्यथा भाजपा जिल्हा नंदुरबार तीव्र आंदोलन करून कार्यालयासमोर दि.१० जुन पासुन आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा निवेदाव्दारे देण्यात आला आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रकाश गवळे,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल शेंडे, सुनिल कोळी यावेळी उपस्थीत होते.