नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे गाडी लावण्याच्या वादातून पती पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे भास्कर निकुंभ यांनी अमोल छगन पटेल यांना गाडी थोडी रस्त्याच्या बाजूला लावा असे सांगितले. याचा राग येवून अमोल पटेल यांनी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास भास्कर निकुंभ यांच्या घरात प्रवेश करत जिवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ करीत भास्कर निकुंभ यांना डेंगार्याने मारहाण केली. दरम्यान किशोर पाटील याने त्याच्या हातातील धार्या घेवून भास्कर निकुंभ यांच्या अंगावर धावून गेला. पतीला सोडविण्यासाठी आलेल्या आशाबाइ निकुंभ यांच्या कपाळाला धार्या लागल्याने त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी अशाबाई भास्कर निकुंभ रा.अंबाजीनगर (लोणखेडा ता.शहादा) यांच्या फिर्यादीवरून अमोल छगन पटेल, किशोर छगन पटेल, छगन पटेल सर्व रा.अंबाजीनगर लोणखेडा (ता.शहादा) यांच्याविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४, २२३, ५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ तारसिंग वळवी करीत आहेत.